अहमदनगर - महापालिकेने महावितरणचे तब्बल २३२ कोटी रुपयांचे वीजबिल थकविले आहे. हे थकीत बिल भरा; अन्यथा पाणी पुरवठ्यावरील वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, अशी नोटीस महावितरणने महापालिकेला बजावली आहे.
महापालिकेच्या वतीने शहराला मुळा धरण येथून पाणीपुरवठा केला जातो. मुळा धरणातून पाणी उपसा करून ते पाइपलाइनने विळद येथील पंपिंग स्टेशनमध्ये सोडले जाते. त्यानंतर विळद येथून हे पाणी पुन्हा वसंत टेकडी येथील टाकीत सोडले जाते. तेथून संपूर्ण शहराला हे पाणी वितरीत करण्यात येते. या सर्व कार्यवाहीसाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात विजेची गरज लागते. मुळाधरण, विळद, वसंत टेकडी या ठिकाणी मोठ्या विद्युत मोटारी बसविण्यात आल्या आहेत.
त्यामुळे महापालिकेला दरमहा सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे वीजबिल येते. त्या तुलनेत पाणीपट्टीतून वसूल होणारे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे महावितरणचे वीजबिल वेळेत भरले जात नाही. परिणामी महापालिकेकडे तब्बल २३२ कोटी रपयांचे वीजबिल थकले आहे. त्यात चार कोटी ७२ लाख १९ हजार रपयांच्या नियमित थकबाकीचा समावेश आहे. ही नियमित थकबाकी तातडीने भरा, अन्यथा पाणी पुरवठ्यावरील वीजपुरवठा खंडित केला जाईल,
अशी नोटीस महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांनी महापालिकेला बजावली आहे. दरम्यान, थकबाकीबाबत महापालिका आणि महावितरण यांच्यात यापूर्वी अनेकदा बैठका झाल्या आहेत. थकीत २३२ कोटी रुपयांची थकबाकी न भरता महापालिका केवळ नियमित थकबाकीचे वीजबिल भरत आहे. त्यामुळे २३२ कोटी रपयांच्या थकीत वीजबिलाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पाणीपुरवठा, पथदिवे, तसेच कार्यालयाचे दरमहा वीजबिल कमी होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे वीजबिल भरण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
कार्यालयाचे बिल १४ लाख
पाणीपुरवठ्यावरील वीजबिलाच्या थकबाकीचा आकडा २३२ कोटी ३१ लाखांच्या पुढे गेला आहे. महापालिकेला सध्या चार कोटी ७२ लाख १९ हजार रुपयांची नियमित थकबाकी भरणे आवश्यक आहे. त्यात महापालिका कार्यालयाचे १४ लाख ३१ हजार रुपयांचे वीजबिल थकले आहे. ही थकबाकी भरण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.
वीजपुरवठा बंदची कारवाई
थकीत वीजबिल न भरल्यामुळे पाणीपुरवठ्यावरील वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई यापूर्वी महावितरणने केली होती. आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. आता महावितरणने पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस दिलेली आहे.
महावितरणने थकीत वीजबिलासाठी नोटीस दिलेली आहे. त्यानुसार वीजबिल भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठा खंडित होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ.
- डॉ. पंकज जावळे, आयुक्त
एकूण थकीत वीजबिल - २३२ कोटी
नियमित थकीत बिल -
४ कोटी ७२ लाख
दरमहा येणारे वीजबिल - १.५ कोटी
कार्यालयाचे वीजबिल - १४ लाख ३१ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.