अहमदनगर : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात विराट मोर्चा काढण्यात आला. शहरासह जिल्हाभरातील हिंदू समाज मोर्चात सहभागी झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चाचा दिल्लीगेट येथे समारोप झाला. यापुढे महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरवात झाली. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’ असा जयघोष करत मोर्चा बसस्थानक, माळीवाडा वेस, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, कापड बाजार, तेली खुंट, चितळे रस्तामार्गे दिल्लीगेट येथे आला.
मोर्चाच्या मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी मोर्चा मार्गाची पाहणी करून बंदोबस्ताच्या सूचना दिल्या होत्या.
सकाळपासूनच माळीवाडा बसस्थानक परिसरात मोर्चेकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली.
आमदार संग्राम जगताप यांनी मोर्चात सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर,
महेंद्र गंधे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, शिवसेनेचे शहरप्रमुख (ठाकरे गट) संभाजी कदम, विक्रम राठोड, शिवसेना शहरप्रमुख (शिंदे गट) दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. दिल्लीगेट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष मोरे व लव्ह जिहाद विरोधी समितीचे गजू धोडगे यांनी मार्गदर्शन केले.
तर रस्त्यावर उतरू
सकल हिंदू समाजातर्फे मोर्चे काढले जातात. मात्र, हा संघर्ष आता इथेच थांबणार नाही. आपल्याला रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. आपल्या मुलांना शिक्षणाबरोबरच छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे हेही कळू द्या, असे आवाहन लव्ह जिहाद विरोधी समितीचे गजू धोडगे यांनी केले. त्याचबरोबर, यापुढे पोलिस दलाने त्यांचे काम केले नाही, तर आम्ही रस्त्यावर येऊन कामगिरी करू, असा इशाराही त्यांनी दिला.
तरुणांमध्ये संताप
मोर्चात भगव्या पताका व निषेधाचे फलक घेऊन चालणाऱ्या रणरागिणी आणि त्यांच्या मागे तरुण, असे मोर्चाचे स्वरूप होते. मोर्चात पहिल्या रांगेत राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नव्हते. मोर्चेकरी तरुणांच्या चेहऱ्यावर संतापाच्या तीव्र भावना दिसत होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.