कोपरगाव - नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्याचा देशातील पहिला प्लॅन्ट सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याने यापूर्वीच सुरू केला. आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाद्वारे गळीताला आलेल्या उसाच्या फडाचा साखर उतारा तपासता येतो. फडावर कीड रोगाच्या प्रादुर्भावाची आगाऊ सूचना मिळते. हे तंत्रज्ञान वापरण्यास आम्ही प्रारंभ केला.
त्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत करार केला. हे दोन्ही प्रकल्प राबविणारा देशपातळीवरील हा पहिला कारखाना ठरला, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.
कोल्हे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे उपग्रहाद्वारे उसाच्या फडाचे मापन, मल्टिस्पेक्ट्रम कॅमेऱ्याच्या साह्याने पानातील हरितद्रव्य पृथक्करण केले जाते. त्यातून अचूक साखर उतारा निश्चित केला जातो. त्याची प्रयोगशाळेत चाचणी केली असता, निष्कर्ष ९५ टक्के अचूक असल्याचे सिद्ध झाले. त्याआधारे मागील गळीत हंगामात तोडणी कार्यक्रम ठरविण्यात आला. त्यामुळे खर्चात बचत तर झालीच.
शिवाय ०.२ टक्के साखर उतारा अधिक मिळाला. प्रायोगिक तत्वावर ५०० शेतकऱ्यांच्या ऊस फडांचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केले. त्यातून जैविक व अजैविक ताणाचे निरीक्षण झाले. पाण्याच्या ताणाची माहिती संकलीत झाली. समाधानकारक निष्कर्ष मिळाले. या सर्व माहितीचा उपयोग करून शेतावर आलेल्या कीड रोगांचे उपग्रहाच्या साह्याने पृथक्करण करता येते. त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होणार आहे.
यावेळी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे करमयोग सिंग, मंदार गडगे, सुमित दरफले, किरण कीर्दक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
माझे आजोबा माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या काळात विदेशात जाऊन नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. देशभरात साखर उद्योगात नवे तंत्रज्ञान यावे, यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले. वडील बिपिन कोल्हे यांनी देखील कारखान्यात सातत्याने नव्या तंत्रज्ञानाच्या वापराचा आग्रह धरला. नव्या युगाची आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापराची ही परंपरा आपण पुढे सुरू ठेवली आहे.
- विवेक कोल्हे, अध्यक्ष, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.