औंढा नागनाथ: फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला अटक करण्यासाठी आलेल्या कोरेगाव (जि. सातारा) येथील पोलिस पथकावर ब्राह्मणवाडा तांडा (ता. औंढा नागनाथ) येथे संशयितासह नातेवाइकांनी हल्ला केला. पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुकी करण्यात आली. वाहनाच्या काचाही फोडल्या. याप्रकरणी २६ जणांविरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः ब्राह्मणवाडा तांडा येथील विनोद नागोराव राठोड हा मुकादम म्हणून काम करतो. त्याने सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याला ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी आठ लाख रुपयांची रक्कम घेतली. मात्र, मजुरांचा पुरवठा केला नसल्याचा आरोप त्याच्याविरुद्ध आहे.
या प्रकरणी कोरेगाव (जि. सातारा) पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान, विनोद त्याच्या गावी असल्याची माहिती मिळाल्यावरून कोरेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक राऊत, जमादार एस. एस. लावंड, एस. एस. सोनुळे, औंढ्याचे पोलिस कर्मचारी त्याला अटक करण्यासाठी गुरुवारी (ता. चार) सायंकाळी ब्राह्मणवाड्यात आले.
पोलिसांनी घरी जाऊन विनोद याला आवाज दिला. तो बाहेर आल्यानंतर त्याला कोरेगाव पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर विनोदने आरडाओरड सुरू केली. त्याचे नातेवाईक आणि काही ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी थेट पोलिस पथकावरच हल्ला चढविला.
यामध्ये उपनिरीक्षक राऊत यांच्यासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून खासगी वाहनाच्या काचा फोडल्या. त्यामुळे पथक परतले. दरम्यान, उपनिरीक्षक राऊत यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात आज तक्रार दिली.
यावरून पोलिसांनी विनोद नागोराव राठोड, नागोराव राठोड, संतोष सुरेश राठोड यांच्यासह अन्य २३ संशयितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, हनुमान बेले तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.