राहुरी विद्यापीठ : वाढते शहरीकरण, वाढती साक्षरता व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे भारतीय शेतीचा चेहरा बदलला आहे. शेतीमध्ये दिवसेंदिवस मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न वाढत आहे. अशा प्रकारे भारताच्या कृषि क्षेत्रात दोलायमान परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल, लोकांमध्ये निर्माण झालेली वैविध्यपूर्ण अन्नाची गरज या प्रश्नांवर उपाय शोधावा लागणार आहे. अन्नाच्या सुरक्षेबरोबरच पौष्टीक सुरक्षेसाठी शेतीला जैवतंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठाच्या ५४ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मायी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, परभणी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, कार्यकारी परिषदेचे दत्तात्रय उगले, माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. शंकरराव मगर, डॉ. किसन लवांडे, डॉ. विनायक पवार, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक सुखदेव बलमे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा असण्याच्या काळात या विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून गेल्या ५३ वर्षात विद्यापीठाने संशोधनाबरोबरच शिक्षण व विस्तार कार्यामध्ये भरीव योगदान दिले आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांनी प्रकल्प तयार करुन जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यापीठातील प्रत्येकाने आपले काम जबाबदारीने, तत्परतेने, पूर्ण समर्पणाने केले तर आपण सर्व क्षेत्रात भरीव योगदान देवू शकू असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले व आभार डॉ. प्रमोद रसाळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने पार पडला.
विद्यापीठाने प्रथमच सूर केलेल्या पुरस्कारामध्ये उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार कसबे डिग्रज येथील सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांंना देण्यात आला. उत्कृष्ट प्रक्षेत्र व्यवस्थापक हा पुरस्कार वडगाव मावळ येथील भात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. नरेंद्र काशीद यांना देण्यात आला. उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार डॉ. उल्हास सुर्वे (राहुरी), डॉ. आनंद जाधव (पुणे), डॉ. अभयकुमार बागडे (कोल्हापूर), डॉ. संदीप पाटील (धुळे) यांना देण्यात आला. उत्कृष्ट संशोधन केंद्र (मोठा गट) पुरस्कार पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला तर उत्कृष्ट संशोधन केंद्र (लहान गट) राहुरी येथील भुईमुग सुधार प्रकल्पाला देण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.