राहुरी : माउंट अबू (राजस्थान) येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्यालयात गेलेले व लॉकडाऊनमुळे अडकलेले राहुरी तालुक्यातील २९ साधक आज शुक्रवारी (ता. १) सायंकाळी चार वाजता परतले. सर्वांना चौदा दिवस 'इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन' करुन, राहुरी शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या अधिग्रहीत केलेल्या 'गीता भवन' ठेवले आहे. अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.
'सकाळ' शी बोलतांना तहसीलदार शेख म्हणाले, "नगर जिल्ह्यातील १११ भाविक शासनाच्या परवानगीने दहा मार्च रोजी माउंट अबू येथे गेले होते. कोरोनामुळे अचानक देशभरात लॉकडाऊन झाले. सर्वजण तिकडे अडकले. दीड महिन्यापासून त्यांना परत आणण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न चालू होते.
आज (शुक्रवारी) सायंकाळी माउंट अबू येथून ३८ भाविकांना घेऊन आलेली एक विशेष बस राहुरीत दाखल झाली. या बसमध्ये राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नऊ, राहुरी शहरातील वीस, श्रीरामपूर तालुक्यातील दोन, सोनई (ता. नेवासा) येथील दोन, अकोले तालुक्यातील पाच जण होते.
राहुरी शहराबाहेर बस थांबवून, राहुरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बसची आतून-बाहेरून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. राहुरी तालुक्यातील २९ जणांमध्ये पाच पुरुष व वीस महिलांचा समावेश आहे. त्यांची राहुरी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली.
सर्वांना चौदा दिवस 'इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन' ठेवण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था राहुरी शहरातील अधिग्रहीत केलेल्या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या 'गीता भवन' केली आहे. सर्वांची प्रकृती उत्तम असून, कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत." असेही तहसीलदार शेख यांनी सांगितले.
'कोटा' च्या बसमुळे धावपळ!
कोटा (राजस्थान) येथे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले होते. त्यांना आणण्यासाठी राज्य सरकारने धुळे डेपोतून ७२ एसटी बस पाठविल्या होत्या. त्यातील एक बस नगर जिल्हा प्रशासनाला न कळवता आली. या बसला जिल्हाधिकारी (नगर) यांच्या आदेशाने आज (शुक्रवारी) सायंकाळी चार वाजता राहुरी बसस्थानकात थांबविण्यात आले. अचानक आलेल्या या बसने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
'सकाळ' शी बोलतांना तहसीलदार शेख म्हणाले, "या बसमध्ये संगमनेर, नगर, अकोले व राहुरी तालुक्यातील एकूण अठरा विद्यार्थी होते. सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी केली. संबंधीत तहसीलदारांना विद्यार्थ्यांची माहिती कळविली.. सर्वांना नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. सर्वांना चौदा दिवस 'इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन' ठेवले जाईल.
राहुरी तालुक्यातील एका विद्यार्थ्याची राहण्याची व्यवस्था त्याच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत केली आहे. त्या गावातील सरपंच, पोलिस पाटील व तलाठी या त्रिसदस्यीय समितीवर जबाबदारी सोपविली आहे." असेही तहसीलदार शेख यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.