अहमदनगर : कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि आता जिल्हा प्रशासन यांनी निर्बंध वाढविले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड, तर लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थिती संबंधित कार्यालयाच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांवर आणली आहे. सार्वजनिक वाहनातून प्रवासासाठी संपूर्ण लसीकरणाची अट बंधनकारक केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचा अध्यादेश काढला आहे.
कोरोनाच्या नवीन विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध निर्बंधांची सक्ती केली आहे. विविध सेवा देणारे, दुकानांचे मालक, परवानाधारक यांच्यासह ग्राहक, सेवा घेणारे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तिकीट असलेल्या अथवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाचे, समारंभाचे आयोजक व सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. तसेच, कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ या ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश राहणार आहे.
सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी राहणार आहे. केंद्र वा राज्य सरकारकडून मिळणारा युनिव्हर्सल पास हा लसीकरणाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार विलगीकरण करण्यात येईल. लसीचे दोन्ही डोस अथवा ७२ तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र मात्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. लग्नसमारंभ, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, सभागृहे अशा बंदिस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींना उपस्थितीची परवानगी राहणार आहे. संपूर्ण खुल्या असणाऱ्या जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभासाठी तेथील जागेच्या २५ टक्के व्यक्तींना उपस्थितीची परवानगी राहणार आहे. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला राहणार आहे. या नियमानुसार, एखाद्या ठिकाणी एक हजारापेक्षा अधिक उपस्थिती असल्यास, त्याबाबत तहसीलदार यांना माहिती द्यावी लागणार आहे.
मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड
मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड, तसेच दुकानदार, आस्थापना चालकांनी मास्क न वापरल्यास संबंधित आस्थापनेला १० हजार रुपये दंड, त्यानंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित संस्था, आस्थापना बंद करण्यात येणार आहेत. वेळप्रसंगी हा दंड ५० हजारांपर्यंतही वाढविण्यात येणार असून, टॅक्सी आणि खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्यांनी नियम मोडल्यास त्यांना ५०० रुपये, तर मालकाला, एजन्सीला १० हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत, त्या व्यक्तींसाठी प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकांकडील प्रमाणपत्र कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.
शिर्डी विमानतळावर अँटिजेन चाचणी
शिर्डी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. तसेच, मागील १५ दिवसांत दक्षिण आफ्रिका आणि जोखीम श्रेणीत असलेल्या देशांतून आलेल्या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.