शिर्डी (जि. नगर) : तेरा वर्षांपूर्वीचा अनुभव लक्षात घेता, सप्टेंबर महिन्यात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाल्यास नाशिक व कोपरगाव या दोन शहरांसह गोदाकाठच्या पंचवीसहून अधिक गावांचे ‘चिपळूण’ होण्याचा धोका आहे. मातीचा भराव टाकून बांधलेल्या या धरणाची साठवणक्षमता अर्धा टीएमसीने कमी करण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी अनेक वर्षांपासून धूळ खात पडला आहे. ढगफुटीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मातीचा भराव टाकून बांधलेल्या धरणांच्या सांडव्यांची फेररचना तातडीने करायला हवी, असा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी सरकारला दिला. त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. (danger to nashik kopargaon cities if cloudburst in gangapur dam area)
ढगफुटीमुळे चिपळूणसह कोकणातील बऱ्याच गावांत उडालेला हाहाकार लक्षात घेता, या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या धरणावर कार्यरत असलेले निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ याबाबत ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘‘२००८मध्ये १९ सप्टेंबर रोजी पहाटे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाली. ७९ हजार क्यूसेक वेगाने पाणी धरणात येत होते. नियमाप्रमाणे १५ सप्टेंबरला धरण ९८ टक्के भरले होते. मोठी जोखीम पत्करून ४२ हजार क्यूसेक पाणी बाहेर सोडले आणि उर्वरित पाणी धरणात अडवून धरले.
सुदैवाने दुपारनंतर ऊन पडले, मोठा धोका टळला. कारण, या धरणाची भिंत मातीची आहे. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी सांडवा व दरवाजे मिळून एक लाख २० हजार क्सूसेक पाणी बाहेर सोडता येते. नाशिकची निळी पूररेषा ७६ हजार क्यूसेक तर लाल पूररेषा ९६ हजार क्यूसेक आहे. हे लक्षात घेतले, तर सप्टेंबर महिन्यात यापुढे अशीच ढगफुटी झाली तर नाशिक ते कोपरगाव या गोदाकाठच्या पट्ट्यात चिपळूणची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. ही पूररेषा २००८ मध्ये निश्चित करण्यात आली. नदीकाठी झालेली अतिक्रमणे, बंधारे व पूल हे महापुराची तीव्रता वाढविण्यास मदत करतात, ही एक गंभीर समस्या आहे. - उत्तमराव निर्मळ (निवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग)
गोदावरी नदीवरील गंगापूर धरण मातीचा भराव टाकून बांधले आहे. या धरणाला पूरसमावेशन क्षमता नाही. सप्टेंबर महिन्यात धरण भरलेले असते. या काळात ढगफुटी झाली तर नाशिक ते कोपरगाव या पट्ट्यात हाहाकार उडू शकतो. हे संकट यापूर्वी आपण अनुभवले आहे. त्यात पावसाची थोडी अधिक भर पडली, तर ‘चिपळूण’ व्हायला वेळ लागणार नाही. - उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग
यापुढे धोके लक्षात घ्यावेत
नदीपात्रातीला छोटे पूल, बंधारे व भोवतालच्या पक्क्या इमारतींची अतिक्रमणे महापुराच्या काळात मोठ्या संकटाला निमंत्रण देतात. पूल व बंधाऱ्यांचे रूपांतर भिंतीत होते आणि महापुराचे पाणी अक्राळविक्राळ रूप धारण करीत वेगाने सखल भागात शिरते. हे धोके यापुढे लक्षात घ्यावे लागतील. धरणात पाणी साठविण्याच्या वेळापत्रकातदेखील बदल करावे लागतील.
(danger to nashik kopargaon cities if cloudburst in gangapur dam area)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.