अहमदनगर : शेअर मार्केटमध्ये बहुतेकजण आपला पैसा कसा वाढेल, या आशेने येतात. काही अनधिकृत ब्रोकरच्या जाळ्यात अडकतात आणि लाखो रुपये नुकसान सहन करतात. ऑप्शन ट्रेडिंग हा अवघड प्रकार प्रचलित आहे.
त्यामध्ये दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्यांवर ‘लॉस’च बूक करण्याची वेळ येते. विशेष म्हणजे डी-मॅट अकाउंट उघडल्यानंतर काही नामांकित कंपन्या खासगी, अनधिकृत कंपन्यांना डेटा विकतात. त्यातून फसवणूक होत असल्याचे या मार्केटमधील तज्ज्ज्ञांचे मत आहे.
एखाद्याने डी-मॅट अकाउंट उघडले आणि ट्रेडिंगला सुरुवात केली, की इतर राज्यातून फोन येण्यास सुरुवात होते. त्यांच्याकडे आपला नंबर गेला कसा, असा प्रश्न पडतो. आपला डेटा संंबंधितांना काही कंपन्यांकडून विकला जातो, हे आपणास माहिती होत नाही.
एखाद्या ब्रोकरेज फर्मकडे डी-मॅट अकाउंट ओपन केले, की त्यानंतर पाच-सहा दिवसातच आपल्याला गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमधून कॉल येतो. बराच वेळेस या ब्रोकरेज फर्मकडूनच आपला डेटा लीक केला जातो. बहुतांशी ब्रोकरेज फर्म आपला डेटा या खासगी ब्रोकरेजना विकतात, असे दिसून येते.
‘क्या आप ऑप्शन मे ट्रेडिंग करते हो!’ आपण हो म्हणालो, की ते सांगतात, ‘कल सुबह तयार रहना, आपको मै एक कॉल देता हू.’ बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्याबरोबर त्यांचा कॉल येतो. ते आपल्याला ऑप्शन कॉल देतात.
निफ्टी किंवा बँक निफ्टी मार्केटमध्ये तेजी असल्यास ‘कॉल’ किंवा मार्केटमध्ये मंदी असल्यास ‘पूट’ घेण्यास सांगतात. त्यांचा सांगितलेला कॉल बरोबर आल्यास आपल्याच डी-मॅट अकाउंटवर दुसऱ्या दिवशी आपल्याला ट्रेडिंग करण्यास सांगतात. ‘तुमच्या खात्यात किती रुपये आहेत,’ असे विचारतात.
आपल्याच खात्यात ट्रेडिंग करायची असल्यामुळे आपणही बिनधास्तपणे आपल्या डी-मॅट अकाउंटला किती रुपये आहेत, हे सांगतो. मग २०, ३० किंवा ५० लॉट घेण्यास ते आपल्याला भाग पाडतात. आपल्या खात्यात एक ते दोन लाख रुपये असतील, तर दीड ते दोन लाखांमध्ये जेवढे लॉट येतील तेवढे घेण्यास सांगतात.
त्यांचा कॉल बरोबर आला तर नफ्याच्या ३० टक्के ते मागतात. त्याचदिवशी कॉल चुकला, तर तेवढा लॉस आपल्याला होतो. ‘उद्याच्या कॉलमध्ये सर्व नुकसान भरून काढू,’ असे सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला व्यवस्थित कॉल देऊ, असे सांगितले जाते.
जर पुन्हा कॉल चुकला, तर मग मात्र त्यांचा कॉल येत नाही. ज्यांना आपण कधी पाहिलेले नाही, त्यांच्या ज्ञानाची आपण कधीही पडताळणी केलेली नाही, अशा लोकांवर विसंबून राहून अनेक लोक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नुकसान करून घेतात.
शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग हा अतिशय अवघड प्रकार आहे. यामध्ये जवळपास ९० ते ९५ टक्के लोक नुकसानच करून घेतात. ‘सेबी’ने सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात वारंवार सावधानतेच्या सूचना केल्या आहेत; परंतु कमी पैशात जास्त लॉट मिळतात. प्रॉफिट झाला, तर चांगला होतो. नुकसान झाले तर ते मोठे होते. नुकसानीचा विचार न करता कमी पैशात जास्त लॉट मिळतात म्हणून अनेक जण ऑप्शन ट्रेडिंग करतात; परंतु यात नुकसानीची शक्यता अधिक असते.
शेअर मार्केटमध्ये स्वतः अभ्यास करा
कोणाच्या सांगण्यावरून मोठ्या रकमेची गुंतवणूक करू नका
जास्त नफा देणाऱ्यांच्या भुलथापांना बळी पडू नका
मोबाईलवरील पासवर्ड, ओटीपी कोणाला देऊ नका
शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन व्यवहार होतात. कॅश कोणालाही देऊ नका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.