अहमदनगर : महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये शंभर टक्के सूट दिली आहे. सवलत देऊनही थकबाकीदार पैसे भरण्यास तयार नाहीत. गेल्या २४ दिवसांत केवळ साडेचार कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली. शास्ती माफीच्या सवलतीचे आता केवळ चार दिवस उरले असून, महापालिका प्रशासनासमोर थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एकरकमी थकबाकी भरा आणि जप्तीची कारवाई टाळा, असे आवाहन करत आयुक्त डांगे यांनी थकबाकीदारांना २८ सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के शास्ती माफीची सवलत दिली. मात्र, थकबाकीदारांनी या सवलतीकडे पाठ फिरवली आहे.
गेल्या २४ दिवसांत केवळ साडेचार कोटी रुपये वसूल झाले आहेत. मालमत्ताधारकांनी २३२ कोटी रुपयांचा कर थकविला आहे. ही थकबाकी वसूल करताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. थकबाकीदारांना दिलासा देऊन जास्तीत जास्त वसुली व्हावी, या उद्देशाने तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शास्तीमध्ये १०० टक्के व नंतर ७५ टक्के, अशी दोनदा सूट दिली होती. मात्र, थकबाकीदारांनी या सवलतीकडे दुर्लक्ष केले.
आता आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी थकबाकीदारांना पुन्हा १०० टक्के शास्ती माफीची सवलत दिली. त्याचबरोबर सुमारे २६ हजार थकबाकीदारांना लोकन्यायालयाच्या माध्यमातून नोटिसा पाठवल्या आहेत. वसुली कर्मचारी घरोघरी जाऊन थकबाकी भरण्याचे आवाहन करत आहेत. चार दिवसांनी शास्ती माफीची सवलत देखील संपणार आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
काय म्हणतात आयुक्त डांगे?
प्रश्नः थकबाकी कशी वसूल करणार?
उत्तर ः थकबाकीदारांना शास्तीवर १०० टक्के सूट दिलेली आहे. या सवलतीमुळे थकबाकीदार पैसे भरण्यास पुढे येतील.
प्रश्नः सवलतीला प्रतिसाद का मिळाला नाही?
उत्तर : १ ते २८ सप्टेंबर या कालावधीत शास्ती माफीची सवलत दिली आहे. परंतु उत्सवकाळात लोकांना पैसे भरता आले नाही. आता ते थकबाकी भरतील.
प्रश्नः शास्ती माफीची सवलत संपल्यानंतर काय?
उत्तर : थकबाकीदारांचा विचार करूनच १०० टक्के शास्ती माफीचा निर्णय घेण्यात आला. परंतु सवलत देवूनही जर ते थकबाकी भरत नसतील, तर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल.
आॅक्टोबरमध्ये जप्तीची मोहीम
शहरातील सुमारे २६ हजार मालमत्ताधारकांना लोकअदालतीमार्फत थकबाकीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या थकबाकीदारांची लोकअदालतीमध्ये सुनावणी होणार आहे. या नोटिसा मिळूनही थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. आॅक्टोबर महिन्यात मनपाची ही जप्तीची मोहीम सुरू होणार आहे.
अशी आहे थकबाकी
एकूण मागणी - २५९ कोटी
वसूल थकबाकी - ३१ कोटी
एकूण थकबाकी - २३२ कोटी
सवलतीनंतर वसुली- ४.५ कोटी
प्रभाग समितीनिहाय थकबाकी
सावेडी- ७१ कोटी
शहर- ३९ कोटी
झेंडीगेट- ३८ कोटी
बुरूडगाव- ८३ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.