जामखेड - पप्पा काळजी घ्या. पण धनगर आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय उठू नका. हा भावनिक सल्ला उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची मुलगी प्रतीक्षा बंडगर हिने आपल्या वडिलांना दिला आहे.
धनगर आरक्षणप्रश्री यशवंतसेनेच्या वतीने चौंडी येथे आज १९ व्या दिवशी आमरण उपोषण चालू आहे. सुरेश बंडगर व अण्णासाहेब रूपनवर यांनी गेल्या चार दिवसापासून जलत्याग करतानाच वैद्यकीय उपचार नाकारात उपोषण चालूच ठेवले आहे.दरम्यान रविवारी सुरेश बंडगर यांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय गंगाखेड (जिल्हा परभणी) येथून आले होते. पत्नी आशा, बीसीए करत असलेली मुलगी प्रतीक्षा, अकरावीत शिकत असलेला मुलगा हरिश यांनी सुरेश बंडगर यांची भेट घेतली. बंडगर यांची त्यांच्या कुटुंबियाबरोबरची भावनिक भेट सर्वांसाठी चर्चेचा विषय राहिला.
आपले वडील गेली १९ दिवसापासून उपोषणाला बसलेले असताना, मुलगी प्रतीक्षा ही वडिलांच्या काळजीपोटी, सुरेश बंडगर यांना भेटण्यासाठी रविवारी गंगाखेड येथून आली होती. बीसीएच्या द्वितीय वर्षात शिकत असलेली प्रतीक्षा हिने आपल्या वडिलांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस करून, ‘पप्पा काळजी घ्या. पण धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय उठू नका’, असे सांगत बंडगर यांच्या निर्णयाला एकप्रकारे पाठबळ दिले.
संवादाने अशा प्रसंगातही मुलीचे आपल्या वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या भूमिकेने उपस्थितांना कुतूहल वाटले.यावेळी यशवंतसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, नितीन धायगुडे , गोविंद नरूटे,किरण धालपे, प्रेम आगुणे, बाळा गायके,ओमकेश वेद्य ,भगवान सानप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पाच हजारांहून अधिक धनगर बांधवांची चौंडीला हजेरी
आंदोलनाच्या १९ व्या दिवशी राज्यभरातील तब्बल पाच हजाराहूनही अधिक धनगर समाज बांधवांनी चौंडीला आंदोलनस्थळी हजेरी लावली.यामध्ये पुणे,बारामती,इंदापूर, दौंड, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, जालना, परभणी, अमरावती येथील धनगर समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.
शिवकुमार डोंगरे यांची भेट
लिंगायत समाज शिवा संघटनेच्या वतीने धनगर आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी आज चौंडी येथे आंदोलनस्थळी भेट देवून, पाठिंब्याचे पत्र आंदोलकांकडे दिले.यावेळी युवक नेते पांडुरंग माने हेही उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.