राहुरी : ‘लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून बहीण लाडकी..! चाय पे शुरू हुई सरकार, गाय पे आकर अटक गयी..! बात तो १५ लाख की हुईं थी, पंधरासौ मे कैसे सिमट गयी..!’ अशी शेरोशायरी करत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढविला.
राहुरी येथे शनिवारी (ता.५) रात्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या संकल्पनेतून डॉ. उषा तनपुरे, सुजाता तनपुरे, सोनाली तनपुरे यांच्या पुढाकाराने ‘आदिशक्तीचा जागर’ सोहळ्याच्या प्रारंभ प्रसंगी खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. प्रारंभी राहुरी शहरातील तुळजाभवानी मंदिर पालखी प्रवेशद्वाराचे डॉ. कोल्हे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील महिलांना राजमाता जिजाऊंचे कर्तृत्व, मातृत्व, नेतृत्वाचा वारसा आहे. त्या सक्षम, समजदार, हुशार असल्याने लाडकी बहीण योजनेचा राजकीय हेतू साध्य होणार नाही. दाजींच्या सोयाबीन, दुधाला भाव द्या, तरच बहीण लाडकी म्हणता येईल.
राजकीय पक्ष फोडून लांडी-लबाडीने सत्तेवर आलेले भाई, दादा, भाऊ यांची राजकीय परिस्थिती बिकट होणार आहे.’’ आगामी विधानसभेला आमदार तनपुरे यांना भरभरून मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.
मुंबईच्या इंडियाज गॉट टॅलेंट फेम एक्स वन एक्स डान्स ग्रुपच्या नृत्याविष्काराने उपस्थित महिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भव्यदिव्य स्टेजवर आकर्षक विद्युत रोषणाईत जागरण गोंधळ, छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे उठावदार सादरीकरण झाले. आर. जे. प्रसन्ना यांचे खुमासदार सूत्रसंचालन महिलांना भावले. खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू व मिष्ठान्न फराळ देण्यात आले. राहुरी-नगर-पाथर्डी तालुक्यांतील हजारो महिलांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
प्रतीकात्मक पालखीची मिरवणूक
देवींची सात रूपे सादरीकरण केल्यावर राहुरीची माहेरवाशीण तुळजाभवानी मातेच्या प्रतिकात्मक पालखीची मिरवणूक काढण्यात आली. आमदार तनपुरे व सोनाली तनपुरे या उभयतांच्या हस्ते पालखीची पूजा-आरती करून समारोप करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.