अहमदनगर : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी दलित समाजाने पाठपुरावा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन १४ जानेवारी होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
आंबेडकरी समाजाच्या बैठकीत जगताप बोलत होते. यावेळी अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय साळवे, विलास साठे, विजय भांबळ, सुमेध गायकवाड, सुनील क्षेत्रे, विजय गव्हाळे, नितीन कसबेकर, किरण दाभाडे, प्रा. विलास साठे आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा दिली आहे.
त्यांचे विचार समाजासमोर यावे यासाठी त्यांचा नगर शहरात भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. सर्वांच्या विचारातून या पुतळ्याची निर्मिती होणार आहे. हा पुतळा असा असेल की, राज्यातील जनता हा पुतळा पाहण्यासाठी आवर्जून नगरमध्ये येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आणि अधिकार मिळवून दिले आहे. त्यामुळे आपण आज लोकशाहीच्या मार्गाने चालत आहोत. सर्वांच्या सहकार्यातूनच चांगले काम उभे रहात असल्याचे जगताप यांनी सांगितले. अशोक गायकवाड म्हणाले, की शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारत असून, याचा सर्वांना आनंदच आहे. आमदार जगताप यांनी पुढाकार घेतल्यामुळेच हे काम पूर्णत्वास जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरच्या वैभवात भर पडेल
नगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी सर्वांची इच्छा होती, ती आता पूर्ण होत आहे. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठे योगदान लाभले आहे. या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडेल, तसेच आजच्या युवा पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अवगत होणार असल्याचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.