संगमनेर (जि. अहमदनगर) : येथील युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी अन्य दोन जणांना हाताशी धरुन, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जप्रकरणे मंजूर करून सुमारे ५६ लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब उघडकीला आली आहे. याप्रकऱणी तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, रूपेश धारवाड (दोघांचा पत्ता माहीत नाही) व विलास एल. कुटे (गणपती मळा, सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत समाधान सीताराम पवार (वय ३५, रा. रामनगर, सायखेडा, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सन २०११ ते २०१३ दरम्यान युनियन बँक ऑफ इंडियाचे (पूर्वाश्रमीची कार्पोरेशन बँक) तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, सिंगल विडो ऑपरेटर रूपेश धारवाड व मध्यस्थ विलास कुटे यांनी संगनमताने १५ जणांच्या नावावर शेतीसाठी कर्जप्रकरणे मंजूर केली होती. या कर्ज खात्याच्या अनियमिततेमुळे चौकशीसाठी आलेल्या पुणे येथील विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उडवाउडवीच्या उत्तरामुळे संशय बळावल्याने, शाखा व्यवस्थापक समाधान पवार यांना सविस्तर चौकशी करण्यास सांगितले.
या चौकशीत अनेक गंभीर बाबी उघडकीला आल्या. खोटे दस्तऐवज व कागदपत्रांच्या आधारे, बँकेचे दिशानिर्देश व नियमांचे पालन न करता, वचनचिठ्ठी व कागदपत्रे न घेता कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली. धनादेश व कर्जाच्या अर्जावरील लाभधारकांच्या सह्या जुळत नाहीत. कर्जाचे धनादेश सक्षम अधिकाऱ्याने मंजूर केलेले नाहीत व त्यावर शेरा अथवा सह्या नाहीत.
कर्जरकमेपैकी काही रक्कम लाभार्थ्यांना देऊन उर्वरित रक्कम मध्यस्थ कुटे व त्याच्या कुटुंबीयांना अनधिकाराने देण्यात आली. शाखा व्यवस्थापक नितीन कुमार याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अन्य दोघांच्या मदतीने ही फसवणूक केली असली, तरी याचा मास्टरमाइंड विलास कुटे हा आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात, बँकेची फसवणूक करून रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरिक्षक मुकुंद देशमुख तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.