राहुरी (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर येथे रविवारी (ता. ५) दुपारी भरवस्तीत शिरलेल्या बिबट्याने धुमाकूळ घालून, मोरगे वस्ती परिसरात आठ जणांना जखमी केले. त्यावेळी कर्तव्य बजावतांना जखमी झालेल्या राहुरीच्या एका वन कर्मचाऱ्याचे नगर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (ता. ८.) पहाटे निधन झाले. या वन शहिदाच्या पार्थिवावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मण गणपत किनकर (वय ५२, रा. ताहाराबाद, ता. राहुरी) असे वन शहिदाचे नाव आहे. राहुरी वनपरिक्षेत्र कार्यालयात वनमजूर पदावर त्यांची नेमणूक होती. श्रीरामपूर येथे रविवारी (ता. ५) दुपारी भरवस्तीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन पथकात किनकर यांना पाठविण्यात आले होते. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात किनकर जखमी झाले. त्यांच्या मांडीला बिबट्याच्या पंजाची नखे दोन इंचापर्यंत घुसल्याने अति रक्तस्राव झाला.
जखमी किनकर यांना श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, नगर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मांडीला झालेली खोल जखम, अति रक्तस्रावाने त्यांचा रक्तदाब कमी झाला. तो तसाच राहिला. तीन दिवस उपचार घेऊन, बुधवारी पहाटे दीड वाजता रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
ताहाराबाद येथे बुधवारी दुपारी वन शहीद लक्ष्मण किनकर यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवण्यात आला. सहा पोलिसांनी 'गार्ड ऑफ ऑनर' दिला. यावेळी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र इंगळे, नाशिक मंडळाचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, नगरच्या उप वनसंरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे, राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवानसिंह परदेशी, वनपाल सचिन गायकवाड, कैलास रोकडे, पवन निकम उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.