शेवगाव ः झोपलेल्या हनुमानाची देशात मंदिरे आहेत. पण झोपलेल्या म्हणजेच निद्रिस्त अवस्थेतील गणपती कधी कुठे बघायला मिळत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाणे (तालुका शेवगाव) या गावी असंच एक देऊळ आहे, जिथे झोपलेल्या गणेशाची मूर्ती आहे. ती मूर्ती स्वयंभू आहे.
अशी आहे अख्यायिका
अहमदनगर पैठण रोडवर तिसगापासून जवळच असलेल्या आव्हाणे गावात पूर्वी दादोबा देव नावाचे गणेशाचे वयोवृद्ध भक्त रहात असत. ते दरवर्षी न चुकता मोरगावची वारी करीत असत. पण एक दिवस वयोमानामुळे ही वारी त्यांना झेपेनाशी झाली. त्यावेळी मोरया गोसावी यांचा दादोबांना दृष्टांत झाला की आता त्यांनी ही वारी थांबवावी. पण दादोबांच्या निस्सीम गणेशभक्तीने काही हे ऐकलं नाही. दादोबा वारीसाठी निघाले.
त्यांच्या वारी मार्गातील एका ओढ्याला खूप मोठा पूर आलेला त्यांना दिसला, त्यावेळी दादोबांनी मोरया गोसावींचं नाव घेतलं आणि ओढ्यात उतरले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर दादोबा कुठेतरी लांब वाहत गेले. त्यानंतर कसेबसे काठाला लागले. चहूबाजूंनी ओढ्याचं पाणी आणि मध्येच एका जमिनीच्या तुकड्यावर दादोबा. त्यावेळी गणपतीचा त्यांना दृष्टांत झाला की, "मीच तुझ्या गावी येत आहे.." पुढे या दादोबा देवांचे निधन झाले.
असा झाला दृष्टांत
एकदा आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्या टणक वस्तूला लागला. नांगर तिथेच थांबला. काय आहे शेतात म्हणून त्याने जमीन खोदायला सुरूवात केली. जमीन खोदत असताना गणेशाची मूर्ती लागली. ती मूर्ती बाहेर काढण्यात आली.
त्याच वेळी दादोबा देवांच्या मुलाला म्हणजेच गणोबा देव याला दृष्टांत झाला की ही मूर्ती जशी आहे तशीच असू देत. त्याच अवस्थेत तिची पूजा कर. तीच स्वयंभू मूर्ती म्हणजे हा निद्रिस्त गणेश.
या मूर्तीच्या छातीवर नांगराचा फाळ लागल्याची खूण अजूनही दिसते. गणेशाचं हे मंदिर प्रशस्त आहे आणि गाभाऱ्यात जमिनीच्या खाली दोन फुटांवर या गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. आणि त्यावर काचेचा दरवाजा आहे.
शाहू महाराजांनी मंदिर बांधले..
कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधले असे म्हंटले जाते. त्यांनी दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यानंतर या वंशजांची आडनावे जहागीरदार, भालेराव अशी पडली. झोपलेल्या म्हणजेच निद्रिस्त अवस्थेतील गणेशाचे महाराष्ट्रातीलच नाही तर बहुदा देशातीलच एकमेव स्वयंभू गणेश मूर्तीचं मंदिर असावे.
संपादन - अशोक निंबाळकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.