नगर : प्रवाशांसह आता एसटी महामंडळाच्या बसमधून मालवाहतूकही केली जाणार आहे. जास्त माल असल्यास ट्रकमधून तो पोचविण्याचे काम एसटी करणार आहे. एसटी महामंडळाची स्थापना रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऍक्ट, 1950 अन्वये एक जून 1950 रोजी झाली. एसटी महामंडळातर्फे टप्पा वाहतूक पद्धतीने प्रवासी वाहतूक करण्यात येते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन करण्यात आले. सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा असून, तो 31 मेपर्यंत जाहीर केला आहे. कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या साथीला अटकाव करण्याकरिता शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राज्यातील मालवाहतुकीवर होणारा विपरीत परिणाम रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रवासी बसमधून मालवाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.
राज्यातील 250 आगारे व 600 बसस्थानकांमार्फत ही वाहतूक होणार आहे. एसटीकडे उपलब्ध ट्रक व प्रवासी बसमधून ही मालवाहतूक केली जाणार आहे. तसेच, मालवाहतुकीसाठी नव्याने ट्रकची व्यवस्था केली जाणार आहे. तशी बांधणी सध्या दापोडीसह विभागीय कार्यशाळांमध्ये सुरू आहे. कोरोना संकटापूर्वी राज्यात एसटीच्या रोज सुमारे 1600 फेऱ्या होत. मात्र, नंतर सर्वच ठप्प झाले. रेड व नॉन रेड झोनमधील वाहतूक सुरू झाली आहे; परंतु ती फक्त 50 टक्के प्रवाशांसह करण्याचे निर्देश असल्याने, एसटीच्या उत्पन्नावर फार मोठा परिणाम झाला आहे. पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरळीत होण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे महामंडळाला उत्पन्नवाढीसाठी एक पर्यायी स्रोत म्हणून मालवाहतुकीच्या उत्पन्नाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ओळखून मालवाहतुकीस सरकारने परवानगी दिली आहे.
महामंडळातर्फे प्रवासी वाहनाच्या अंतर्गत रचनेत बदल करून करावयाच्या मालवाहतुकीसाठी मध्यवर्ती कार्यालयात व विभागीय स्तरावर एक स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे.
बसस्थानकात बुकिंग
राज्यातील प्रत्येक बसस्थानकात मालवाहतुकीचे बुकिंग केले जाणार आहे. मालाची चढ-उतार हमाल करणार आहेत. पहिल्या टप्प्यात बसच्या माध्यमातून मालवाहतूक होणार असून, त्यात वाढ करण्याच्या सूचना विभागनियंत्रकांना दिल्या आहेत.
सरकारने एसटीला मालवाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्याची अंमलबजावणी नगर विभागात सुरू केली आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, त्या माध्यमातून बुकिंग घेण्याचे काम सुरू आहे. मालवाहतुकीचे जाळे विस्तारणार असून, त्यासाठी दापोडी येथे ट्रकबांधणीचे काम सुरू आहे.
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर
एसटीतर्फे मालवाहतुकीस परवानगी मिळाली असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नियंत्रण कक्षात दूरध्वनी येऊ लागले आहेत.
- दादासाहेब महाजन, वाहतूक अधीक्षक, एसटी महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.