अहमदनगर : महापालिकेकडून पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी चोरून वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दरवर्षी १८ ते २० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शहरात एक लाख ३१ हजार मालमत्तांची नोंद असून, अधिकृत नळजोडांची संख्या ५२ हजार आहे.
मालमत्तांच्या तुलनेत अधिकृत नळजोडांची संख्या वाढत नसल्याने महापालिकेला दरवर्षी पाणीपट्टीत कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे.शहरात नवीन नागरी वसाहती उभ्या राहात आहेत. महापालिकेच्या दप्तरी एक लाख ३१ हजार मालमत्तांची नोंद आहे. परंतु अधिकृत नळजोडांची संख्या मात्र अद्याप साठ हजारांच्या पुढे गेलेली नाही.
मालमत्तांच्या तुलनेत नळजोडांची संख्या एक लाखापेक्षा अधिक हवी होती. परंतु हजारो मालमत्ताधारकांनी अनधिकृतपणे नळजोड घेतलेले आहेत. परिणामी महापालिकेला पाणीपट्टी वसुलीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला दरवर्षी सुमारे ३५ कोटी रुपये खर्च करावे लागतात.
याउलट पाणीपट्टी वसुलीतून महापालिकेला अवघे ९ ते १० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्न आणि खर्चातील ही तफावत भरून काढण्यासाठी महापालिकेने अद्याप कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस अनधिकृत नळजोडांची संख्या वाढून मनपाच्या उत्पन्नातील घट सुरूच आहे.
पाणीपट्टीत वाढ नाही
महानगरपालिकेची २००३ मध्ये स्थापना झाली. यावेळी पाणीपट्टीचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर २० वर्षांच्या कालावधीत पाणीपट्टी दरात वाढ करण्यात आलेली नाही. प्रशासनाने वेळोवेळी वाढ सुचविली. परंतु स्थायी समितीने ही दरवाढ फेटाळून लावली. विशेष म्हणजे शहरात व्यावसायिक नळजोडांची संख्या केवळ दोन हजार २७७ एवढीच आहे.
मीटरने होणार पाणीपुरवठा
शहरात लवकरच मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नळांना मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. पाण्याचा जेवढा वापर, तेवढीच पाणीपट्टी भरावी लागणार आहे. नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना त्याचा लाभ होईल. परंतु पाणी चोरीचा प्रश्न कायम राहणार आहे.
असे आहेत दर
अर्धा इंची नळजोड - १५००
एक इंची नळजोड - ६०००
पाऊण इंची जोड -३०००
पाणीपुरवठ्याचा तोटा
२०१७- १८ (१७. ५९ कोटी)
२०१८- १९ (१५. १२ कोटी)
२०१९- २० (२१. २१ कोटी)
२०२०- २१ (२३. २० कोटी)
२०२१- २२ (२५. ४८ कोटी)
२०२२- २३ (२३. ६० कोटी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.