श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : तालुक्यात साखर कारखाने वगळता कुठलेही औद्योगीकरण झालेले नाही. तथापि, श्रीगोंदे मतदारसंघातील नगर-दौंड महामार्गालगतचे सुमारे सव्वापाच हजार हेक्टर क्षेत्र उपयोगात येणार असल्याची परिस्थिती व तसा प्रस्तावही सादर झालेला आहे. आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावानंतर आदेश होऊनही स्थळपाहणीसुद्धा झालेली नाही.
अडचण कुठलीच नाही, मग अडलय कुठे?
तालुक्यातील विसापूर परिसरातील चिखली, कोरेगाव, घोसपुरी, देऊळगाव सिद्धी, हिवरे झरे, सारोळे कासार या श्रीगोंदे व नगर तालुक्यांच्या भागातील पाच हजार ३३८ हेक्टर जमीन औद्योगिकीकरणासाठी वापरात येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, औद्योगीकरण वाढण्यासाठी ज्या सुविधा लागतात, त्या सगळ्याच आहेत. नगर-दौंड महामार्ग, दौंड-मनमाड रेल्वेमार्ग लगत आहे. शिवाय, नगर शहरापासून हा परिसर २५ किलोमीटरवर आहे.
हे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव २०१५ व २०१०७ अशा दोन टप्प्यांत प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक यांच्याकडे सादर झालेला आहे. चिखली व कोरेगाव परिसरातील या नव्या प्रस्तावात पाण्याचीही सोय दाखविण्यात आली आहे. मुळा धरणावरून सुपे (ता. पारनेर) व अहमदनगर शहरातील औद्योगिक वसाहतीसाठी पाणी आणलेले आहे. या पाण्याचा शेवटचा भाग चिखलीपासून जवळच आहे. शिवाय, मुळाच्या पाण्याचे आरक्षण शिल्लक असल्याने नव्या योजनेत घेता येईल. वीजपुरवठ्याचीही अडचण नाही.
याप्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या क्षेत्राची स्थळपाहणी करण्यासाठी १४ जून २०१८ ही तारीख निश्चित केली होती. मात्र, त्या दिवशी उपरोक्त क्षेत्राची स्थळपाहणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुन:श्च स्थळ आणि तारीख मुख्यालय स्तरावर निश्चित करून कार्यालयास कळविण्याबाबत उपरोक्त पत्रान्वये कळविण्यात आले होते. संदर्भीय पत्रानुसार बबनराव पाचपुते यांनी उद्योगमंत्र्यांना पत्र पाठवून चिखली, कोरेगाव क्षेत्राच्या निर्मितीसाठी तातडीने कार्यवाही करण्याबाबत कळवले होते. तथापि, अजूनही प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची स्थळपाहणीची तारीख निश्चित झालेली नाही.
चाळीसगावची पुनरावृत्ती श्रीगोंद्यातही होऊ शकते...
हीच परिस्थिती चाळीसगाव (जि. जळगाव) या भागात होती. त्यावेळी तेथे उपजिल्हाधिकारी व श्रीगोंद्याचे सुपुत्र अरुण आनंदकर यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने हा प्रश्न निकाली काढला. त्यामुळे त्या परिसराचे औद्योगीकरण झपाट्याने होत आहे. श्रीगोंद्यात हे होऊ शकते. मात्र, त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना डोळसपणे प्रयत्न करावे लागतील.
''श्रीगोंदे मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांच्या औद्योगिकीकरणाला यामुळे चालना मिळणार आहे. आपण पाठपुरावा करीत आहोत. त्यात यश येईल, ही अपेक्षा असून, तसे झाल्यास मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट होईल.'' - बबनराव पाचपुते, आमदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.