अहिल्यानगर

Haregaon History : 'तेव्हा आणि आज..' देशातला पहिला खासगी साखर कारखाना सुरू होणाऱ्या नगरच्या हरेगावचा इतिहास..

महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावाचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही.

कामिल पारखे

महाराष्ट्रात भौगोलिकदृष्ट्या हरेगावाचे स्थान काय आहे हे फार लोकांना माहित नाही. हरेगाव हल्लीच्या हमरस्त्यावर नाही, मात्र याच हरेगावामुळे या परिसरात हमरस्ते आणि रेल्वे स्टेशने तयार झाले, औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला आणि आसपास श्रीरामपूरसारखे त्याकाळात अस्तित्वात नसलेले शहर निर्माण झाले. ही बाबसुद्धा लोकांना माहित नसणार अहमदनगर जिल्ह्यातच आणि श्रीरामपूरजवळ असलेले शिर्डी हे स्थळ जगाच्या नकाशावर आपली जागा राखून आहे. मात्र शिर्डी हे नावारुपाला आले ते अलीकडच्या काळात, म्हणजे सत्तरच्या दशकात.

त्याकाळात श्रीरामपूरहून मी आणि माझा एक मित्र सायकलने शिर्डीला जायचो, तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मुले आणि इतर भाविक लोक थेट साईबाबांच्या मूर्तीसमोर बसायचो. देवदर्शन झाल्यावर काही क्षण मंदिरात किंवा पायऱ्यांवर काही क्षण स्वस्थ बसायचे असते हे मी त्यावेळी शिकलो. आजूबाजूला भिंतीही नव्हत्या आणि अजिबात गर्दी नसायची यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही. याउलट हरेगाव मात्र फार पूर्वीपासून एक गजबजलेले ठिकाण होते.

समाजमाध्यमावर `आम्ही हरेगावकर' या ग्रुपचा गेली काही वर्षे मी सभासद आहे. हरेगावशी माझे जवळचे नाते आहे. गेल्या शतकात ब्रिटिश काळात भारतात ग्रामीण भागांत ज्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाली, त्या स्थळांमध्ये हरेगावचे महत्त्वाचे स्थान आहे.

याचे कारण म्हणजे भारतातला पहिलावहिला खासगी साखर कारखाना हरेगावात ब्रिटिश जमान्यात सुरु झाला होता. हरेगावात ब्रिटीश काळात सुरु झालेली बेलापूर शुगर फॅक्टरी जशी देशातला पहिला खासगी साखर कारखाना तसेच ब्रिटिशांनी भारतात १९२६ साली बांधलेले पहिले धरण अहमदनगर जिल्ह्यातच अकोले तालुक्यात भंडारदरा येथे आहे. आता ११ टीएमसी क्षमता असलेले हे भंडारदरा धरण जिल्ह्याची जीवनदायिनी आहे.

हरेगावच्या या बेलापूर शुगर फॅक्टरी कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सामाजिक, आर्थिक आणि साधनसुविधांबाबत मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले. आमच्या श्रीरामपूर शहराची तर वेगळीच कथा आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातलं एक प्रमुख आणि तालुक्याचं ठिकाण असलेल्या या शहराला शंभर वर्षांचाही इतिहास नाही. बिनवेशीचं आणि अठरापगड जतिजमातीच्या लोकांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराची मुळी निर्मिती झाली ती इथल्या रेल्वेस्थानकामुळं.

आणि हे रेल्वे स्थानक कशामुळे अस्तित्वात आले ? तर हरेगावातल्या या खासगी साखर कारख्यान्यामुळे! हे ऐकून नव्या पिढीला आज गंमतच वाटणार आणि सद्याच्या श्रीरामपूर आणि हरेगावची परिस्थिती अगदी विरुद्ध टोकांत बदलली आहे. आज खुद्द श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यातले एक मोठे शहर आहे आणि हरेगावची ओळख श्रीरामपूर तालुक्यातले गाव अशी करून द्यावी लागते.

ब्रिटिश अमदानीत पुणे-दौंड- मनमाड या मार्गावर रेल्वे धावू लागली आणि श्रीरामपुरात रेल्वेचा एक थांबा सुरु झाला. ब्रिटिश काळातच श्रीरामपूर इथून बारा-तेरा किलोमिटर अंतरावर असलेल्या हरेगाव येथे देशातला - अन आशिया खंडातलासुद्धा पहिला - साखर कारखाना सुरु झाला.

दी बेलापूर शुगर कंपनी या एका ब्रिटिश कंपनीनं ही शुगर फॅक्टरी १९२४ साली स्थापन केली. सर जोसेफ के हे या साखर कारखान्याचे संस्थापक. सन 1924 ते 1958 या मोठ्या कालखंडात दी बेलापूर शुगर कंपनी या साखर कारखान्याचे ते सलगतेने चेअरमनपद होते. स्वतंत्र भारतामधील म्हणजेच महाराष्ट्रातीलही साखर धंद्याचे जनक असे त्यांना संबोधले जाते.

तेव्हा जवळ असलेल्या बेलापूर गावाचं नाव या कारखान्याला दिलं, बेलापूर शुगर फँक्टरी. या कारखान्याच्या सोयीसाठी या ठिकाणी एक रेल्वे थांबा दिला गेला आणि या रेल्वे स्टेशनची स्थापना झाली. या रेल्वे स्टेशनला स्थानिक ठिकाणचे नाव हवे म्हणून या दिलं होतं साखर कारखान्याला दिलं होतं त्याच इथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच बेलापूर गावाचे नाव देण्यात आलं. श्रीरामपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या रेल्वे स्टेशनचे `बेलापूर स्थानक' हे नाव आजतागायत आहे, आहे कि नाही गंमत?

पुण्यामुंबईत, नाशिक, मराठवाड्यात कुठल्याही रेल्वे स्टेशनवर श्रीरामपूरचे तिकीट मागितले कि तिथला क्लार्क झटकन बेलापूरचे तिकीट देतो, महाराष्ट्राबाहेर मात्र असं चालणार नाही. श्रीरामपूर या नावाचं एक मोठे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे. तुम्ही महाराष्ट्राबाहेर भारताच्या एखाद्या कोपऱ्यांत असाल आणि तेथून श्रीरामपूर रेल्वे स्टेशनचे तिकीट मागितले तर अडचणीत येऊ शकाल. हा खुद्द माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग.

पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करुन मी रशिया-बल्गेरियातून भारतात परतलो आणि दिल्लीतून रेल्वे प्रवासात श्रीरामपूरचे तिकीट मागितले तेव्हा गडबडगोंधळ होऊन मला भलतेच तिकीट मिळाले होते. श्रीरामपूरला (बेलापूरला !) फॉरेन रिटर्न मी ओव्हरकोट वगैरे खूप सामानासह उतरलो तेव्हा तिकीट चेकरने अडवल्यावर, माझे तिकीट पाहून त्याने मला थांबायला सांगितले.

नंतर कोपरगाव ते श्रीरामपूर असा विनातिकीट प्रवास केल्याबद्दल तिकीट रकमेच्या दुप्पट दंड (सहा रुपये) भरावा लागला होता ! ही घटना १९८६ची आहे. पुण्यात खडकी येथे लष्कराचे मोठे ठाणे आहे, या विविध लष्करी संस्थांतून रणगाडे, तयार केलेला दारुगोळा, जिप्स वगैरे देशभर वाहून नेण्यासाठी रेल्वेचा वापर केले जातो. तर या वस्तू आणि वाहने मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी खडकी येथील या संस्थापर्यंत रेल्वेचे रूळ जोडले आहेत आणि या रुळांचा वापर केवळ लष्करी सेवांसाठी होतो.

अगदी त्याचप्रमाणे केवळ या साखर कारखान्यासाठी तब्बल तेरा किलोमीटर लांबीचे नॅरो गेज रूळ श्रीरामपूर म्हणजे बेलापूर रेल्वे स्टेशनपासून बेलापूर फॅक्टरीपर्यंत जोडण्यात आले होते.

या बेलापूर शुगर फँक्टरीत कच्चा माल असलेल्या ऊसाची आणि नंतर पक्क्या मालाची म्हणजे साखरेची वाहतूक करण्यासाठी या बेलापूर रेल्वे स्टेशन अन हरेगावचा साखर कारखाना यादरम्यान छोट्या रुळांवर - नॅरो गेजवर - इंजिन आणि मालगाडी धावू लागले. या मालगाडीला `लॅडीस' या नावाने ओळखले जात असे.

हरेगावला आणि श्रीरामपूरला मी असताना अनेकदा या ऊसाने भरलेल्या किंवा मोकळ्या लॅडीसने काही मीटर अंतराचा गार्ड्सची नजर चुकवून अनेकदा प्रवास केला आहे.

साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता.

त्याकाळात हरेगावात डी क्वार्टर्स वगैरे साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या बंगलेवजा कॉलनीज होत्या, आजूबाजूला एकवाडी ,दोनवाडी अशा अनेक वाड्या असायच्या, तेथून बैलगाडयांनी ऊस यायचा, हरेगाव नुसते गजबजलेले असायचे नंतर श्रीरामपूरजवळच दोन किलोमिटर अंतरावर टिळकनगर येथे खासगी मालकीची महाराष्ट्र शुगर फॅक्टरी सुरु झाली आणि या आधुनिक औद्योगिक क्रांतीमुळे श्रीरामपूर हा नवा परिसर बाळसे धरू लागला आणि थोड्याच अवधीत ते अहमदनगर शहराच्या खालोखालचे जिल्ह्यातले एक मोठे शहर बनले.

ऐंशीच्या दशकापर्यंत श्रीरामपूरजवळचे हे दोन्ही खासगी साखर कारखाने नव्याने उदयास आलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे बंद पडले. एकेकाळी बारा तालुके असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तेरा साखर कारखाने होते.

बंद पडलेल्या या कारखान्यांवर प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या अवलंबून असणाऱ्या पूरक उद्योगांचे, आसपासच्या हजारो लोकांचे आणि कुटुंबांचे रोटी-रोजगार बुडाले आणि श्रीरामपूरच्या वाढत्या आर्थिक वैभवाला खीळ बसली.

शेजारचा अशोक सहकारी कारखाना याबाबतीत फार मदत करू शकला नाही. त्यामानाने शेजारीच असलेल्या लोणी-प्रवरानगर परिसराने -आधी विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यानंतर बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय नेतृत्वाखाली खूप मोठी मजल मारली.

एकेकाळी बेलापूर शुगर फॅक्टरीसाठी राज्यभर प्रसिद्ध असलेले हरेगाव हल्ली तिथं भरणाऱ्या मतमाऊलीच्या म्हणजे मदर मेरीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या सेंट तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगमध्ये १९७०च्या दरम्यान मी दुसरी आणि तिसरीला असताना होतो. या सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी-रविवारी भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून पाच लाखाच्या आसपास ख्रिस्ती समाज आणि इतर लोक जमतात.

या हरेगावच्या मतमाऊली यात्रेबाबत येथेच मी विस्तृत लेख लिहिलेला आहे. माझ्या ``क्रुसाभोवतालचा मराठी समाज'' या पुस्तकात तो समाविष्ट केलेला आहे, या यात्रेनिमित्त उद्या ऑगस्ट २९ रोजी हरेगावच्या गगनचुंबी देवळात मदर मेरी मतमाऊलीच्या दहा दिवसांच्या नोव्हेना प्रार्थना सुरु होतील. इथले संत तेरेजा चर्च उंचच-उंच मनोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.

हरेगावात प्रवेश केला कि सुरुवातीलाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा दिसतो. बाबासाहेबांनी पन्नासच्या दशकात हरेगावला भेट दिली होती, या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. मतमाऊलीच्या यात्रेला येणारे अनेक लोक भक्तिभावाने बाबासाहेबांच्याही पुतळ्याला हार घालत असतात.

मुंबईच्या बांद्रा येथील मौंट मेरी यात्रेला पर्याय म्हणून जर्मन जेसुईट फादर गेराल्ड बाडर यांनी हरेगावची मतमाऊली यात्रा सुरु केली. मतमाऊलीच्या यात्रेचे हे अमृतमहोत्सवी (७५) वर्ष आहे. यावर्षी यात्रेला जाण्याचा माझा विचार आहे.

आता हरेगावला या यात्रेनिमित्त गेलं आणि तिथल्या रस्त्यांची आणि गल्लीबोळांची दुर्दशा पाहिली कि माझ्यासारख्या अनेकांना या गावाचे गत वैभव आठवते आणि मन अगदी खिन्न होतं.

या आठवड्यांत हरेगावचे नाव वृत्तपत्रांत दररोज झळकत असल्याचे पाहून मन तर अधिकच खिन्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT