अहमदनगर : ‘घर पहावे बांधून, लग्न पहावे करून आणि विहीर पहावी खोदून,’ असे म्हटले जाते. या तीनही गोष्टी सर्वसामान्य कुटुंबांना अवघड. त्यातील शहरी भागातील नागरिकांना घर आणि लग्न या दोन गोष्टी सतावणाऱ्या. सध्याच्या काळात लग्न जमविणेही अवघड. हेच अवघड काम सोपे करतात नगरचे खलील चौधरी. त्यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील तब्बल ५५० विवाह जुळविले आहेत. सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून विवाह मोफत लावून दिली आहेत.
नगरमधील चौधरी रिश्ते नाते ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाजी शेख खलील यासीन चौधरी सामाजिक काम करतात. नगरमधीलच नव्हे, तर महाराष्ट्रात ते ‘लग्न लावणारे चौधरी’ म्हणून ओळखले जातात. ज्यांचे विवाह जमलेले आहेत; परंतु आर्थिक अडचणीमुळे ते लावणे शक्य नसते, अशांना चौधरी यांचा मोठा हातभार लागतो.
समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून ते सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करतात. सध्या चौधरी सेवानिवृत्त आहेत. शहरातील मंगलगेट भागात राहतात. समाजातील मुला-मुलींचे विवाह जमविण्यात त्यांच्या वडिलांना छंद होता. त्यांनी त्या काळी सुमारे ५० दाम्पत्यांचे संसार सुरू करून दिले. हाच कित्ता खलिल यांनी गिरविला.
खलिल यांना आतापर्यंत २५ पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र गौरव, आदर्श समाजसेवक, मौलाना आझाद ॲवॉर्ड, समाजभूषण असे पुरस्कार देऊन समाजाने त्यांचा यथोचित गौरव केला आहे. हे सर्व करीत असताना त्यांच्या पत्नी मुमताज, मुलगा आकील, मुलगी तब्बसूम सय्यद यांचे सहकार्य लाभत असल्याचे खलिलभाई आवर्जून सांगतात. समाजात गरीब कुटुंबांना मुलांचे विवाह करून देणे मोठा बोजा वाटतो. त्यामुळे अशा कुटुंबांना समाजाने आधार देण्याची गरज आहे.
सुट्या टाकून जोपासला छंद
विविध ठिकाणी नोकरी करताना खलील चौधरी यांनी समाजातील गरीब मुलांचे विवाह मोफत लावून देण्याचा छंद जोपासला. त्यासाठी अनेकदा हक्काच्या सुट्ट्या वापराव्या लागल्या. अनेक वेळा तर बिनपगारी सुट्या टाकून स्वतः नुकसान सहन करून ही सेवा सुरू ठेवली. सध्या सेवानिवृत्त आहेत. जास्त फिरणे होत नसले, तरीही विवाहेच्छूक कुटुंबात ते जाऊन माहिती घेऊन वधू-वर मिळवून देण्याचे काम करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.