राहुरी : सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमिनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मंगळवारी (ता.१०) राहुरीतील शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध केला. अगोदर गुणांक दोनप्रमाणे भाव जाहीर करावा. तोपर्यंत आम्ही मोजणी होऊ देणार नाही, असा पवित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे हतबल होऊन अधिकारी माघारी परतले.
मागील दोन वर्षांपासून सुरत-हैदराबाद महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. त्यास, शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी विरोध केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी व शेतकऱ्यांची अनेकदा बैठक झाली. मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
राहुरी तालुक्यात राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, सडे, खडांबेचा काही भाग येथे राष्ट्रीय महामार्ग विभाग, महसूल, कृषी व भूमी अभिलेख यांच्या अधिकाऱ्यांची पथके पोलिस बंदोबस्त घेऊन भूसंपादन प्रक्रियेसाठी जमिनीच्या मोजणीसाठी गेले.
यावेळी राहुरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी मोजणीला कडाडून विरोध केला. अगोदर गुणांक दोनप्रमाणे भाव जाहीर करावा. त्याबाबत लेखी द्यावे, असा आग्रह धरला. तोपर्यंत आम्ही प्रशासनाला कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नाही. प्रशासनाने जबरदस्ती केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी भारत भुजाडी, सुभाष वराळे, सूर्यकांत भुजाडी, गंगाधर सांगळे, राजेंद्र वराळे, नंदू वराळे, जमीर आतार. संभाजी वराळे, विजय कोहकडे, दत्तात्रेय गुलदगड, बाळासाहेब तोडमल, अशोक तोडमल, नंदकुमार दहिवाळकर आदिंसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
प्रांताधिकारी किरण सावंत यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करुन मोजणी करुन देण्याची विनंती केली. परंतु, शेतकरी निर्णयावर ठाम राहिले. मंगळवारी दुपारी उशीरापर्यंत कोणताच मार्ग निघाला नाही. पोलिस बंदोबस्त घेऊन देखील अधिकारी शेतकऱ्यांसमोर हतबल झाले. तर शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.
सुरत-हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत राहुरी बुद्रुक व परिसरातील शहरी भागात गुणांक दोनप्रमाणे जमिनीचा मोबदला देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेस विरोध करू नये.
- किरण सावंत, प्रांताधिकारी, श्रीरामपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.