राहाता : रात्री दोनचा सुमार, नीरव शांतता... अचानक घराच्या दरवाज्यावर काही तरी वजनदार वस्तू जोराने आदळल्याचा आवाज. कुत्र्याचा कल्लोळ. सीसीटीव्हीत बघितले, तर कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात दहा फूट उंच झेपावलेला बिबट्या दरवाजावर आदळला. कुत्र्याकडून कडवा प्रतिकार झाल्याने भांबावला.
एवढ्या गडबडीत त्याने कुत्र्याच्या पिलाला जबड्यात धरले. खाली उतरण्यासाठी मारलेली त्याची दुसरी उडी फसली. तोल गेल्याने तो भांबावला. जबड्यातली शिकार पळून गेली. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण सार्थ ठरली. पिंपळस येथील शेतकरी सुनील वैजापूरकर यांच्या वस्तीवर कालच्या रात्रीचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला.
जमिनीपासून सुमारे दहा फूट उंच असलेल्या घराच्या ओट्यावर कुत्रीसह त्याचे पिलू शांतपणे झोपलेले होते. रात्री दोनच्या सुमारास बिबट्या पायऱ्या चढून त्यांच्याकडे झेपावला. अनपेक्षित हल्ल्यामुळे कुत्रे बिथरले. ओट्याच्या उंच कठड्यावर चढून जोराने भुंकू लागले. बिबट्या घाईने पायऱ्या उतरून पुन्हा खाली गेला. समोर जमिनीवर उभे राहून त्याने कुत्र्याच्या दिशेने सुमारे दहा फूट उंच झेप घेतली.
कुत्र्याने हुलकावणी दिल्याने बिबट्या थेट घराच्या लोखंडी दरवाजावर जाऊन आदळला. मोठा आवाज झाला. कुत्र्याने खाली उडी मारली. पिलू मात्र बिबट्याच्या तावडीत सापडले. त्याला जबड्यात धरून त्याने खाली उडी मारली.
अंदाज चुकल्याने जबड्यातले पिलू सटकले, लांब पळून गेले. भांबावलेल्या बिबट्यावर धावून जात कुत्र्याने तिखट प्रतिकार सुरू केला. घरातली मंडळी जागी झाली. प्रज्ज्वल आणि शैलेश या भावंडांनी घराच्या बाहेरील बाजूचे दिवे सुरू केले. त्यामुळे आणखीनच गडबडलेला बिबट्या आल्या दिशेने निघून गेला.
बिबट्याच्या जबड्यात सापडूनही पिलू मात्र आश्चर्यकारकरित्या जिवंत राहिले. किरकोळ जखमेवर भागले. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण सार्थ ठरली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.