अहमदनगर : शेतीच्या पाट पाण्याच्या वादातून ज्ञानेश्वर नागरगोजे (रा. भातकुडगाव ता. शेवगाव) या शेतकऱ्याचा खून करणाऱ्या चित्तरंजन रामचंद्र घुमरे (वय 31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे (वय 35 दोघे रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) या दोघा सख्या भावांना जन्मठेपेची (Life imprisonment) शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी ठोठावली आहे.
ज्ञानेश्वर नागरगोजे हे भातकुडगाव (ता. शेवगाव) येथे आई-वडिलांसोबत राहून शेती करत होते. त्यांच्या मामाचा मुलगा वैभव हरिभाऊ सानप (रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड) हा भातकुडगाव येथे शेती कामाच्या मदतीसाठी आला होता. ता. 5 मार्च 2020 रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर व वैभव हे पिकाला पाणी देण्याठी शेतात गेले होते. ज्ञानेश्वर यांनी शेजारील चित्तरंजन व प्रियरंजन घुमरे यांच्या शेतजवळील पाटपाण्याच्या चारीचे पत्राचे गेट उघडल्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास सामनगाव चौफुलीवर मुळा चारीच्या पाटावर आले. त्याठिकाणी चित्तरंजन व प्रियरंजन हे दुचाकीवरून आले. "आमच्या शेताजवळील चारीचे पत्राचे गेट का काढले ?' असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. ज्ञानेश्वर या मारहाणीत सुमारे 10 फुट उंचीवरून खाली डोक्यावर पडला. त्यांच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घुमरे बंधू तेथून पळून गेले. वैभवने परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने ज्ञानेश्वरला उपचारासाठी शेवगाव येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले.
वैभव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात आरोपी घुमरे बंधूंच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. घुमरे बंधूंच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड, व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा कापसे-गायके यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले. सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश जोशी, विजय गावडे, ए. टी. बटुळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्य केले.
सुमारे नऊ महिने उपचार
घुमरे बंधूंच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शेतकरी ज्ञानेश्वर नागरगोजे यांच्यावर प्रारंभी शेवगाव येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती दिवसेंदिवस घालवत गेली. पुणे येथे उपचार सुरू असताना त्यांचा ता. 11 डिसेंबर 2020 रोजी मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.