msrtc  sakal media
अहिल्यानगर

‘त्या’ दोन ‘चाकां’ना भरावी स्थैर्याची ‘हवा’

कोणतंही वाहन आयुष्यभर धावतं. त्याची निर्मितीच त्यासाठी झालेली. एसटी ही गाडी लाखो प्रवाशांना सुखरूप पोचवून रिटायर होते. तिची पुढची दोन अन्‌ मागची चार चाके कायम गरगरतात.

मुरलीधर कराळे

कोणतंही वाहन आयुष्यभर धावतं. त्याची निर्मितीच त्यासाठी झालेली. एसटी ही गाडी लाखो प्रवाशांना सुखरूप पोचवून रिटायर होते. तिची पुढची दोन अन्‌ मागची चार चाके कायम गरगरतात. खड्ड्यांमधील आदळआपट, तापलेले डांबर, रस्त्यांवरील काटे- खिळ्यांची त्यांना पर्वा नसते. आणखी दोन चाके आयुष्यभर तिच्यासोबत धावतात... चालक व वाहक. जेवढा चाकांचा प्रवास, तेवढाच या दोघांचाही. खड्ड्यांमध्ये गाडी आपटल्याने यांचीही हाडे खिळखिळी होतात. कौटुंबिक अस्थैर्य, कमी वेतन, सरकारी कर्मचारी म्हणून मिरवतात, पण अनेक लाभांपासून वंचित. सतत लोकांशी सामना. कधी अवहेलना, तर कधी अपमानाची नामुष्की. तरीही ही दोन चाके अविरत पळतात, महामंडळाचा अन्‌ स्वतःच्या संसाराचा गाडा ओढत. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद तंतोतंत पाळत...

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एसटी वाहक दिलीप काकडे यांनी एसटीलाच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. नागपूरमध्येही एसटीच्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. इतरांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचला. यापूर्वी कोरोनाकाळात एसटीच्या राज्यभरातील २३ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात चालकांची संख्या १३ आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा संप होता. काही मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला, मात्र अनेकांना हे मान्य नाही. सर्वच मागण्या मान्य कराव्यात, असा त्यांचा आग्रह. त्यामुळे राज्यातील अनेक एसटी आगारांमध्ये अद्यापही बंद आंदोलन सुरूच राहिले. त्यातच ताजी घटना एसटीला धक्का देणारी ठरली.

आयुष्यभर एसटीत नोकरी करताना चालक-वाहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बसमध्ये प्रवासी तिकीट काढतो. एसटीच आपल्या मालकीची असल्याचा त्याचा आविर्भाव असतो. चालक-वाहक जणू आपले कर्मचारी असल्याचा त्याचा तोरा असतो. त्याच मानसिकतेतून अनेक जण चालक-वाहकांशी किरकोळ कारणामुळे भांडतात. हे भांडण मिटवून घेण्याचाच या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो. एसटीचा एखाद्याला धक्का लागला किंवा दुसऱ्या वाहनचालकाची चूक असली तरीही एसटीलाच दोष देण्याची पद्धत समाजात रुजली आहे बिचाऱ्या चालकाला जीव मुठीत धरून कसं तरी निभवावं लागतं. गुन्हा दाखल झाला, तर पगारवाढ, नोकरीत मेमो ठरलेला. ती भीती वेगळीच. आंदोलकांकडून एसटीची जाळपोळ होताना हताश होऊन त्यांना पाहत राहण्याशिवाय पर्याय नसतो. अशी अनेक प्रकारची हेटाळणी या दोघांना सहन करावी लागते.

एसटी कर्मचारी आयुष्यात काय कमावतो, कर्ज काढून घेतलेले घर, मुली-मुलांचे शिक्षण, लग्न. बस्स, इतकंच. पगार तरी किती असतो, नवीन वाहकचालकांना 14 ते 15 हजारांपासून सुरवात. निवृत्तीलाही 40 हजारांच्या वर जात नाही. कुटुंबापासून रोजच बाहेर राहायचे. लांबचा रूट मिळाल्यास दोन दिवस घरापासून अलिप्त राहायचे. कुटुंबातील सदस्यांचे आजारपण, मुलांची शाळा, आजार हे सर्व इतरांच्या भरवशावर. घरातून बाहेर पडले, की दोन वेळचे जेवण कुठे मिळेल, हेही अनिश्चित. बाहेरचं जेवण जास्त घ्यायचं नाही, ही सर्वसामान्यांची उक्ती इथे गारद होते. रोजच 250 पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करायचा. एसटीची घरघर, प्रवाशांची बडबड. मानसिक स्थैर्य कसे मिळणार? इतर नोकऱ्यांत आठ तास काम केले, की घरी जाता येते. इतर वेळेत संसाराला आधार म्हणून घरगुती व्यवसाय करता येतो. इथं तसं काहीच नाही. पगारावरच सर्व भिस्त. सरकारमधील अधिकारी, पदाधिकारी भरती करतात, महामंडळाविषयीचे निर्णय घेतात, परंतु कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा नसतो, हीच मोठी शोकांतिका या कर्मचाऱ्यांची आहे.

कायम तोट्यात असलेले मंडळ म्हणून एसटीकडे पाहिले जाते. कसे येणार नफ्यात? सरकार 42 प्रकारच्या सवलती एसटीच्या माध्यमातून देते. त्यापोटी येणारी रक्कम मात्र वेळेत दिली जात नाही. केवळ प्रवाशांकडून रोख स्वरूपात येणाऱ्या पैशांवर महामंडळ नफ्यात कसे येणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. एसटीचे चालक-वाहक ही दोन चाके अंधारात आहेत. अस्थैर्यात आहेत. त्यांना स्थैर्याची हवा भरण्याची गरज आहे. एसटी सुमारे पाच हजार कोटींवर तोट्यात आहे. नफ्यात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे नफ्याची वाट न पाहता सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा गांभीर्याने याचा विचार करायला हवा. त्यांना पगारवाढ, इतर सवलती द्यायला हव्यात.

"सेवानिवृत्तीनंतर एसटीचे कर्मचारी भरपूर आजार सोबत घेऊन येतात. सांधेदुखी, मणकेदुखी, कमरेचे आजार, गुडघ्यांचा त्रास, शारीरिक थकवा, हे सर्व अखेरपर्यंत राहते. सेवानिवृत्तीच्या दरम्यान रजेचे पैसे अनेक दिवस रखडले जातात. पेन्शनसाठी खेट्या माराव्या लागतात."

- एकनाथ औटी, सेवानिवृत्त वाहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT