अहमदनगर : भाषा कोणतीही असो, ती आधुनिक रूपात येत असताना अनेक शब्द मागे टाकते. इतर भाषांचे आक्रमण होताना काही शब्दांना पानगळीप्रमाणे सोडून द्यावे लागते. पण याच ‘पालापाचोळ्या’प्रमाणे गळून पडलेल्या शब्दांना उर्जितावस्थेत आणत आहेत एक अभ्यासू प्राध्यापक.
त्यांनी मराठीतील लुप्त होत असलेल्या अनेक शब्दांचा संग्रह करून ते वापरात येण्यासाठी प्रयत्न केले आहेत.येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा. डॉ. सचिन कोतकर यांनी ही किमया केली आहे. सांकेतिक व गुप्त भाषा शब्दांचा अभ्यास या विषयावर त्यांनी पीएच.डी.ही मिळविली आहे.
विशेषतः नगर जिल्ह्यातील भाषा नगरी समजली जाते. पुणेरी शुद्ध मराठीची तिला संगत आहे. त्यामुळे ती हळूहळू बदलतेय. नागरी शब्दालंकार बदलून पुणेरी शब्द त्यावर मात करीत आहेत. याबाबत प्रा. कोतकर यांनी खास संशोधन केले आहे.
त्यांनी कृषीविषयक, नातेवाचक, नीतिनियमासंबंधी, चालीरीतीविषयक, घरगुती, प्राणीवाचक, विवाहासंबंधी अंत्यसंस्कारासंबंधी असे विविध स्वरूपाचे शब्द पीएच.डी. संशोधनाच्या वेळी मुलाखती घेऊन संकलित केले आहेत. पीएच.डी.च्या प्रबंधासाठीच नव्हे, तर प्रा. कोतकर हे सतत मराठी भाषेवर विशेष काम करीत आहेत.
त्यांना प्राचार्य डॉ. शंकर थोपटे, प्रा. डॉ. भास्कर निफाडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पीएचडीसाठी प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांचे मार्गदर्शन लाभले. शब्दसंकलनासाठी वडील माधवराव कोतकर यांचे विशेष मदत झाल्याचे प्रा. कोतकर आवर्जुन सांगतात.
मराठीतील लुप्त होऊ पाहत असलेले शब्द
कानुला (करंजी), कोरड्यास, कालवण (भाजी), आळी (गल्ली), खमीस (सदरा), गेलतो (गेलो होतो), आलतो (आलो होतो), म्हसणवाटा (स्मशानभूमी), जानुसा (लग्नात वऱ्हाडी मंडळींना थांबण्याची जागा), ऐतवार (रविवार), इवळणे (ओरडणे), कवाड (दरवाजा), भगुलं (पातेलं),
घंगाळ (अंघोळीचे भांडे), बोडखं (केस नसलेलं), बुचाट (वापरलेल्या केरसुणीचा राहिलेला भाग), म्होरं (पुढे), यरवाळी (दिवस मावळण्याच्या अगोदर), आवतण (आमंत्रण), इसार (आगाऊ दिलेली रक्कम), परण्या (नवरदेवाची मिरवणूक),
पान्हाडी (मृत व्यक्तीस पाणी पाजणारा), विसावा (वेशीबाहेर मृत व्यक्तीचा देह ठेवण्याची जागा), इंगळी (मोठा विंचू), गडंगनेर (नातेवाईक, मित्रमंडळींना लग्नाअगोदर दिलेले जेवण), एकांटा (एकटा), खपाटी (उपाशी), उजूक (नंतर), ढळली (हलली) हे शब्द सध्याच्या ज्येष्ठ पिढीला माहीत आहेत, परंतु पुढील पिढीपासून दुरावले जाणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.