श्रीगोंदे : श्रीगोंदे कारखाना येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. आणि प्रशासनसह नागरीकांनी घेतलेली मेहनत वाया गेली. आता त्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटूंबातील सहा जणांचे स्त्राव घेतले जाणार आहेत. तो परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर झाला आहे. कोरोना पेशंट सापडल्यामुळे प्रशसानाची तारांबळ उडाली असताना त्यांच्यामागे वेगळंच झेंगट लागलं आहे. ते म्हणजे मटक्याच्या पावत्या गोळा करण्याचे...
श्रीगोंदा कारखाना, मढेवडगाव चर्चेत
कारखाना व मढेवडगाव ही दोन गावे त्यासाठी चर्चेत आहेत.
श्रीगोंदे कारखाना येथील एक ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित झाला. तो पुण्यावरुन नुकताच आला होता. त्याला पुण्यातच त्रास जाणवला असेल मात्र येथे आल्यानंतर त्रास वाढला. त्या तरुणाचे वजन शंभरपेक्षा जास्त असल्याने इतर आजारही असण्याची शक्यता आहे. त्याला त्रास जाणवल्यावर काष्टी येथील आरोग्य केंद्रात दाखविले. नंतर श्रीगोंदेतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून नगरला हलविले व त्यात त्याचा स्त्राव कोरोनाबाधित निघाला.
या सगळ्या घडामोडीनंतर तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक दौलत जाधव, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन खामकर यांनी काल रात्री तो परिसर सील केला. तो सगळा भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करीत अत्यावश्यक सेवासह सगळेच चौदा दिवसांसाठी बंद केल्याचे माळी यांनी सांगितले.
हेही वाचा - बेरोजगारीची नो चिंता- रोहित पवार देणार नोकरी
कोरोनाबाधिताचा नातेवाईकच एजंट
आता सर्वात मोठी अडचण कोरोनाबाधिताच्या नातेवाईकाच्या संपर्कात आलेल्या लोकांची झाली आहे. कारण बाधित तरूणाचा नातेवाईक मटक्याचा व्यवसाय करतो. दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत. तो नाईवाईक मटका लावणाऱ्यांच्या पावत्या घरपोहोच करतो. त्यामुळे हे काम करीत असताना त्याचा कारखाना व मढेवडगाव येथे जास्त संपर्क होता. त्यामुळे तो अनेकांच्या संपर्कात आलेला आहे. मटक्याचा आकडा लावणाऱ्यांना कानावर ही माहिती गेली आहे. त्यामुळे त्यांचेही धाबे दणाणले आहे. चिठ्ठीसोबत त्याने कोरोना तर वाटला नाही ना, अशा भीतीने त्यांची गाळण उडाली आहे.
मटका जोरात
आता या दोन ठिकाणी मटका खेळणारे शोधण्याची वेळ ग्रामपंचायत व प्रशासनावर आली आहे. लॉकडाउन असल्याने सगळे धंदे बसले आहेत. किंवा बंद आहेत. मात्र, मटक्याचा व्यवसाय तेजीत आहे.हे या घटनेवरून समोर आलं आहे.
कर्जतच्या मटका बुकींच्या मिटिंगलाही उपस्थिती
कर्जत तालुक्यातील एका बड्या मटक्यावाल्याने श्रीगोंदे तालुक्यातील मटका धंदा करणाऱ्या धंद्यावाल्यांची शुक्रवारी कारखाना येथे बैठक घेतली. तीत हा कोरोनाग्रस्ताच्या जवळचा व्यक्ती उपस्थितीत असल्याची माहिती आहे.
मटक्याच्या पावत्या द्या
या मटक्यावाल्याची माहिती मिळाल्यावर प्रशासनातील एका अधिकाऱ्याने परिसरातील तरुणांकडे मोठ्या उत्सुकतेने चौकशी सुरु केली. त्यावेळी तो अधिकारी तरुणांना म्हणाला, त्या मटक्याच्या फाडलेल्या पावत्या शोधून मला द्या. त्यावरुन त्या लोकांचा शोध घेता येईल. या गंभीर प्रसंगातही तरुणांना हसू आवरले नाही. आणि त्या पावत्यांवर कुणाचे नाव छापायला का ते लोक वेडे आहेत, असे सांगितल्यावर त्या अधिकाऱ्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. कारण पावत्यांवर केवळ आकडेमोड असते. त्यात कोणाच्या नावाचा उल्लेख नसतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.