अहमदनगर : मुळा एज्युकेशन सोसायटीमधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून प्रतीक बाळासाहेब काळे (वय २७, रा. तेलकुडगाव, ता. नेवासे) या लिपिकाने शुक्रवारी (ता. २९) रात्री अकरा वाजता धनगरवाडी (ता. नगर) शिवारात कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
प्रतीकची बहीण प्रतीक्षा काळे (वय २३, रा. तेलकुडगाव, ता. नेवासे) हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की वडील बाळासाहेब हनुमंत काळे, आई उज्ज्वला, भाऊ प्रतीक आणि अक्षय यांच्यासह तेलकुडगाव येथे राहत आहे. बाळासाहेब काळे मुळा सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी विभागात नोकरी करतात. प्रतीक मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये लिपिक म्हणून काम करत आहे. प्रतीक इमानदारीने काम करीत होता. वरील सात वरिष्ठांना हे आवडत नव्हते. त्यामुळे त्यांनी मागील सहा महिन्यांपासून त्याला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. येथे नोकरी करू नको, महाराष्ट्रात राहू नको, असे ते म्हणत होते. प्रतीकची सोनई येथील खासगी खाणावळही या व्यक्तींनी बंद केली होती.
संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांना चार ते पाच हजार रुपये उचल (ॲडव्हान्स) देण्याची तरतूद आहे. प्रतीकने पाच हजारांची मागणी केली होती. विनायक दा. देशमुख यांनी एक हजार रुपये मंजूर केले. त्यानंतर गुरुवारी (ता. २८) नोकरीचा बळजबरीने राजीनामा लिहून घेतला. या सर्व घटना तो लहान भावासह आपणास सांगत होता.
प्रतीकने शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान लहान भाऊ अक्षय यास व्हॉट्सॲपवर, वरिष्ठ सात व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ पाठविला. कुटुंबीयांनी पोलिसांनासांगून प्रतीकचा शोध सुरू केला.
रात्री अकराच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर वांबोरी फाटा (धनगरवाडी, ता. नगर) शिवारात हॉटेल सुवर्णज्योतपासून सुमारे ४०० फूट आतमध्ये कडुनिंबाच्या झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात वरील सात जणांविरुद्ध, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशमुख, बेल्हेकरांवर आहे आरोप
या संस्थेत विनायक दामोदर देशमुख, महेश गोरक्षनाथ कदम, राहुल जनार्दन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, जगन्नाथ कल्याणराव औटी, हे नोकरीस आहेत. मुळा कारखान्यात रावसाहेब भीमराज शेळके आणि रितेश बबन टेमकर नोकरीस आहेत. हे सर्व जण प्रतीकचे वरिष्ठ आहेत. देशमुख यांनी राजीनामा घेतल्यानंतर प्रतीक नैराश्यात गेला. त्यातून त्याने हे पाऊल उचलले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.