अहिल्यानगर

Balasaheb Thorat : बाळासाहेबांनी सत्यजित तांबेंच्या जन्मावेळी बैलगाडी हाकत हॉस्पिटलमध्ये पोहचवलेलं

भाऊसाहेब थोरात वयाच्या अठराव्या वर्षी महात्मा गांधी यांच्या ‘चले जाव’ चळवळीनंतर स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील झाले. पुढे वयाच्या ८६ व्या वर्षांपर्यंत त्यांनी सहकाराची उभारणी, शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलने, लढे, चळवळीचे नेतृत्व केले. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करताना न थकता न थांबता काम करत राहिले. - सौ दुर्गा सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष संगमनेर नगरपरिषद

सकाळ वृत्तसेवा

सौ दुर्गा सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष संगमनेर नगरपरिषद

संगमनेर - मृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर संगमनेर तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या जोर्वे गावाला ऐतिहासिक, आध्यात्मिक परंपरा आहे. दत्त महाराजांचे पुरातन मंदिर नदीतीरावर आहे. जोर्वे संस्कृती या नावाने ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर मिरवणारे जोर्वे हे आमचे गाव.

या कुटुंबाला नैतिकतेचा समृद्ध इतिहास आहे. आमचे पणजोबा गंगाराम पाटील थोरात, पणजी मंजुळाबाई थोरात अर्थात गावची पाटलीण. या दाम्पत्याचा या परिसरात मोठा दबदबा व नावलौकिक होता. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावातून परिवार घडत गेला.

त्यांच्या मुलांना त्यांनी शहरात ठेवून शिक्षण दिले. त्यामुळे माझे आजोबा संतूजी पाटील थोरात हे इंग्रजी मॅट्रिक झाले. माझी आजी सीताबाई सुद्धा दिघे पाटील या नावाजलेल्या जमीनदार परिवारातून आली. त्यांच्या पोटी सहा मुले (तीन मुले व तीन मुली). सर्वांत थोरले माझे वडील भाऊसाहेब थोरात, पंडितराव व मधुकर हे बंधू आणि भगिनी मीराबाई, हिराबाई आणि ताराबाई. माझे वडील व त्यांची ही सर्व भावंडे अतिशय बुद्धिमान.

भाऊसाहेब थोरात वयाच्या अठराव्या वर्षी महात्मा गांधी यांच्या ‘चले जाव’ चळवळीनंतर स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील झाले. पुढे वयाच्या ८६ व्या वर्षांपर्यंत त्यांनी सहकाराची उभारणी, शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलने, लढे,

चळवळीचे नेतृत्व केले. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करताना न थकता न थांबता काम करत राहिले. सोसायटीच्या अध्यक्षपदापासून आमदार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत उत्तमपणे काम सांभाळले. सहकारी संस्था काटकसरीने, व्यापारी, व्यवहारी वृत्तीने जपल्या. सहकार वाढवला. दादा सुरवातीला कम्युनिस्ट होते.

आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्यातील कम्युनिझम त्यांनी जपला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते पुरस्कर्ते होते. सत्यशोधक पद्धतीने कोणताही खर्च न करता कोल्हेवाडीच्या दिघे परिवारातील मथुराबाईंबरोबर ते विवाहबद्ध झाले. भाऊसाहेब व मथुराबाई थोरात यांच्या पोटी आम्ही चार बहिणी, एक भाऊ म्हणजेच आज महाराष्ट्राला नेतृत्व देणारे आमदार बाळासाहेब थोरात यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५३ रोजी झाला.

आम्हा सर्व बहिणींचा लाडका... त्याला आम्ही ‘भाऊ’ म्हणतो. उत्तम नेतृत्व घडते ते एका दिवसात नाही, तर त्याला परंपरा असते पूर्वजांची. अशी समृद्ध परंपरा भाऊंना मिळाली. आजोबा व वडिलांना वाचनाची आवड होती. दादांना स्वातंत्र्य चळवळीत डॉ. अण्णासाहेब शिंदे, अ‍ॅड. रावसाहेब शिंदे, अ‍ॅड. पी. बी. कडू पाटील, धर्माजी पोखरकर इत्यादी सहकाऱ्यांबरोबर नाशिकच्या तुरुंगात सहवास लाभला. त्यातून सामुदायिक वाचनाची सवय लागली व विचार समृद्ध झाले. भाऊंनाही वाचनाची आवड आहे.

माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये व नंतर लॉ कॉलेजमध्ये वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. पुण्यात त्यांनी पाणी पंचायतीमध्ये पाणी प्रश्नांवर, परीक्षा फी माफीसाठी आंदोलन केले. वकील झाल्यानंतर १९८० साली कामगारांच्या प्रश्नावर आंदोलनाचे नेतृत्वामुळे त्यांना ९ दिवसांचा कारावास झाला.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत भाग घेतला. सहकाराची सुरवात जोर्वे दूध संस्थेची स्थापना करून केली. १९८५ साली जनतेच्या प्रेमामुळे ‘सर्वांत कमी वयाचा आमदार’ म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. भाऊ कुटुंबवत्सल आहेत. आत्यांपासून तर सर्व बहिणी-मुलींवर त्याचे लक्ष असते.

सणाचा आनंद सर्वांबरोबर साजरा करतात. कांचन वहिनींचे माहेर इस्लामपूर तालुक्यातील तांबवे आहे. त्याही भाऊंच्या बरोबरीने कुटुंब, नातेवाईक, कार्यकर्त्यांकडे लक्ष देतात. भाऊंनी आम्हाला कधीच मोठा भाऊ म्हणून रुबाब दाखवला नाही. आम्हाला शाळेत, कॉलेजमध्ये असताना खूप सांभाळले. होस्टेलवर सोडणे आणि मधूनमधून भेटायला येणे, चौकशी करणे, तब्येत बरी नसल्यास दवाखान्यात नेणे,

ही सर्व कामे ते आपुलकीने, मायने करत. माझा मोठा मुलगा सत्यजितच्या जन्माच्या दिवशी अतिवृष्टी झाली. रस्त्यावर खूप चिखल झाला. बैलगाडी चालवीत आम्हाला हॉस्पिटलला पोचविले. माझा छोटा मुलगा डॉ. हर्षल लहानपणी रात्री खूप रडायचा. पहाटे भाऊ येऊन म्हणायचा, ‘बाई तू झोप. मी झोका देतो.’ भाच्यांचे, पुतण्यांचे, मुलींचे लाड करणे, खांद्यावर घेऊन फिरणे, डोंगरावर करवंदे खायला नेणे,

धरणावर फिरायला नेणे यासाठी सर्वांना वेळ देतात. भाऊचा स्वभाव कुटुंबवत्सल असल्याने भावंडे, भाचे व नातेवाइकांमध्ये तो आवडता आहे. भाऊ आमचे सर्वस्व आहे. भाऊंमध्ये साधेपणा, काटकसर, दूरदृष्टी असल्याने ते राजकारणात, समाजकारणात एवढी प्रगती करू शकले. ते मितभाषी आहेत. आनंदाने हुरळून जाणे व दु:खाने खचून जाणे त्यांच्या स्वभावातच नाही. ते स्थितप्रज्ञ स्वभावाचे आहेत.

राजकारणात, कुटुंबातही ओरडणे हे त्यांच्या स्वभावात नाही. मी सर्वांत लहान असूनही त्यांनी आजपर्यंत मला शब्दानेही दुखावले नाही. राजकारणात वरवर गोड बोलणे, गळ्यात पडणे व खालून पाय ओढण्याचे काम कधीच केले नाही. त्यांचा स्वभाव म्हणजे आपले काम व्यवस्थित करत राहणे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी यांनी राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर कायमस्वरूपी सदस्य करून घेतले आहे.

आमचे मामा डॉ. अण्णासाहेब शिंदे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते. त्यांचे भाऊंवर विशेष प्रेम होते. त्यामुळे भाऊ नेहमी सुट्टीत दिल्लीला जात. मामांमुळे स्वर्गीय इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजीव गांधी अशा मोठ्या माणसांचा सहवास लाभला. मामांबरोबर परदेश दौरेही केले.

त्यातूनच भाऊंचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. भाऊ शांत व संयमी वृत्तीचे आहेत. धरसोड वृत्ती त्यांच्यात नाही. पद असो वा नसो शांतपणे काम करणारा, साधेपणा जपणारा, माणसांना आपुलकीने जीव लावणारा, कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारणारा म्हणून भाऊंना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे ते आवडते आहेत. अशा अभ्यासू ,

शांत व्यक्तिमत्त्वामुळे १९९९ साली राज्यमंत्रिपद मिळाले. २०२२ पर्यंत महसूल मंत्रिपद व अनेक महत्त्वाची खाती मिळाली. प्रत्येक वेळी खाते सांभाळताना त्यांच्यातील अनेक गुणवैशिष्ट्यांचे पैलू आपल्याला दिसले. एवढ्या मोठ्या राज्याच्या मंत्रिपदाचा, मतदारसंघाचा व्याप सांभाळत असताना त्यांनी सहकाराचे व्यवस्थापन उत्तम ठेवले आहे. सध्या संपूर्ण भारतात दिशादर्शक असलेला संगमनेरचा सहकार त्यांच्या दूरदृष्टी व उत्तम व्यवस्थापनातून दिमाखाने उभा आहे.

संगमनेर तालुक्यातील उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधांचा संगमनेर ब्रँड तयार झाला असून, आजवर हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांच्या या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत निळवंडे धरण पूर्ण करून आता कालवे ही पूर्ण होत आहेत. हा त्यांच्या व शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे.

संगमनेर शहराकडे विशेष लक्ष देऊन अनेक वर्षांपासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना निळवंडे धरणातून थेट ग्रॅव्हिटीने पाणी आणून मुबलक स्वच्छ व शुद्ध पाणी देणे हा शहरवासीयांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण होता. अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवली आहे. अत्याधुनिक बसस्थानक व इतर इमारती व विकासकामांनी संगमनेर शहर सजले आहे.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते कधीही थकलेले दिसत नाहीत. सुख-दु:खाच्या ठिकाणी आवर्जून भेटी देतात. त्यांच्या कामांना गती, पारदर्शकता असते. काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे व एकनिष्ठपणे काम करत असल्याने त्याची दखल घेत पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली. इतर राज्यांच्या निवडणुकीतही जबाबदारी दिली.

कामाच्या व्यापात त्यांच्या कन्या शरयू, सविता, जया यांच्याशी त्यांचा रोज फोनवर संवाद असतो. त्यांना शिक्षणात व कामात टाळाटाळ आवडत नाही. मुलगा राजवर्धन हा अमेरिकेत आर्किटेक्चर मध्ये पीजी करत आहे. सौ. कांचन वहिनी नातं, गोतं, कुटुंब व्यवस्थित सांभाळत असल्याने भाऊंना काळजी नाही. दादांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान पुढे नेत २८ कोटींच्या बियांचे रोपण, ८० लाख रोपांची लागवड त्यांनी केली आहे.

वास्तुशांती, वाढदिवसाला ते झाडांची रोपे भेट देत असतात. निसर्गात त्यांचे मन खूप रमते. त्यांनी आमचे आजोबा संतूजी थोरात यांची आयुष्याच्या अखेरची काही महिने खूप सेवा केली. तीर्थरूप दादा व बाई यांची खूप काळजी घेतली. अशा आमच्या लाडक्या बंधूसाठी आम्ही बहिणी एवढेच म्हणतो की,

‘माहेरचा देवा, नाही तुला विसरत

पाठीच्या बंधूजीचा, वेल जाऊदे पसरत

आमच्या आयुष्याची देवा, आखूड घाल दोरी,

हौशी बांधवाला माझ्या, घाल शंभरी पुरी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT