अहमदनगर - झाकण नसलेल्या हौदात पडून एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील प्रत्येक इमारतीमधील झाकण नसलेल्या हौदांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने मुकुंदनगरमधील काही हौद जेसीबीने बुजविले आहेत. मात्र, नागरिकांनी स्वतः सजग होऊन हौदांना झाकणे बसवून घ्यावीत, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
शहरात दिवसेंदिवस इमारतींची संख्या वाढत आहे. इमारतीचे बांधकाम करताना पाण्यासाठी पहिला हौद बांधला जातो. परंतु या हौदांच्या झाकणांकडे बहुतेकजण दुर्लक्ष करतात. अपार्टमेंट, बंगला, रो- हाऊस, तसेच व्यावसायिक इमारतींमधील हौदांना झाकणे नसल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुकुंदनगर येथे एक चार वर्षांचा चिमुरडा खेळत असताना झाकण नसलेल्या हौदात पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी या घटनेची दखल घेत संबंधित हौद जेसीबीने बुजवून टाकला. नागरिकांनी आपल्या घरातील, परिसरातील हौदांना तत्काळ झाकणे बसवावे, असे आवाहन केले.
गुन्हे दाखल, तरी जाग येईना
शहर आणि परिसरात हौदात पडून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्यानंतरही अशा घटना घटतच आहेत. मुकुंदनगरमध्ये तर चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणी हौदाच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी हौदांना झाकणे बसविणे गरजेचे आहे.
नवीन इमारतींचे हौद उघडे
शहरात जागोजागी नवीन इमारतींची बांधकामे सुरू आहेत. बांधकामांच्या ठिकाणी पाण्यासाठी हौद बांधला जातो. परंतु इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे हौद उघडेच असतात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी महापालिकेने बांधकाम परवानगी देताना काही नियम घालून देण्याची गरज आहे.
ड्रेनेजही झाकणाविना
शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या झाकणांची मोडतोड झालेली आहे. भूयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी भूयारी गटारीचे झाकणे देखील गायब आहेत. त्यामुळे ड्रेनेजमध्ये पडून एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट श्वान, जनावरे उघड्या ड्रेनेजमध्ये पडून जखमी झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
मुकुंदनगर येथे चार वर्षांच्या मुलाचा झाकण नसलेल्या हौदात पडून मृत्यू झाला. महापालिकेने संबंधित हौदाची पाहणी करून तो बुजवून टाकला आहे. नागरिकांनी हौदांना झाकणे बसविणे गरजेचे आहे.
- यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.