Ahmednagar News: प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह सरकारी कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. उद्या (गुरुवार) पासून ते संपावर जाणार आहेत. यापूर्वीही त्यांनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता.
त्यावेळचे आश्वासन न पाळल्याने सर्व संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, वारंवारच्या संपामुळे शाळांतील अध्यापनावर, तसेच शासकीय कामावर परिणाम होणार आहे. या संपाची झळ विद्यार्थ, तसेच सर्वसामान्यांना सोसावी लागणार आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सरकारी, निमसरकारी (जिल्हा परिषद), शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी संपाचा इशारा दिला आहे. जुन्या पेन्शनबाबत शिक्षक व इतर कर्मचारी आक्रमक आहेत. शाळांबाबत सरकारने आणलेला कंपनी कायदा व खासगीकरणाचा कायदा रद्द करावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
१३ ते २० मार्चदरम्यान राज्यातील व जिल्ह्यातील सर्वच कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्या दरम्यान सर्व सरकारी कामकाज कोलमडले होते. जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गीय संघटना सहभागी झाल्याने मुख्यालयात शुकशुकाट होता.
सरकारने गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु सर्वच संघटना संपावर ठाम राहिल्याने आठवडाभर काम ठप्प होते. संपामध्ये शिक्षक व सरकारी कर्मचारी सहभागी होणार असल्याने शाळांतील अध्यापनावर, तसेच कामावर परिणाम होणार आहे.
जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विठ्ठल उरमुडे, राज्य शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, गोवर्धन पांडुळे, महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, राजेंद्र लांडे अशा सुमारे २० संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या पत्रकावर सह्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी १० वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे यांनी दिली. विविध विभागाच्या कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले जाईल. जिल्ह्यातील महसूल विभागाचे तलाठी, कोतवाल, महसूल सहायक आदी तीन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण कामकाज ठप्प होणार आहे. शिक्षकही या संपात सहभागी होणार आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा माध्यमिक शिक्षकांच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी मागील आंदोलनात सक्रिय भूमिका घेतली होती. न्यू आर्टस् महाविद्यालयासमोर त्यांनी बैठा सत्याग्रह केला होता. यंदाही संघटनांनी तसेच नियोजन केले आहे.
उद्या न्यू आर्टस् महाविद्यालयाजवळून मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. त्यात किमान दोन हजार शिक्षक सहभागी होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संपाबाबत सरकारसोबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत. ती सफल झाल्यास संप मागे घेतला जाऊ शकतो.
जुनी पेन्शन लागू करावी, कंपनी कायदा रद्द करावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करावी. रिक्त पदे त्वरित भरावीत, अनुकंपा तत्त्वाची नियुक्ती करावी. कंत्राटी धोरणाचे उच्चाटन करावे. चुतर्थ श्रेणी कर्मचारी व वाहनचालक या पदांच्या भरतीवरील बंदी उठवावी. शिक्षक क्षेत्रातील दत्तक योजना व समूह शाळांच्या योजनांद्वारे शाळांचे कॉर्पोरेटधार्जिणे खासगीकरण रद्द करावे. नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करावा. सेवानिवृत्तीचे वय ६० करावे. पाचव्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने संपाला बाहेरून पाठिंबा दर्शवला आहे. लेखा कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटनेनेही त्यांची री ओढली आहे. मागील आंदोलनात यांचा सक्रिय सहभाग होता.
या संघटनांचे कर्मचाऱ्यांनी संपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे. सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. दुपारच्या सुटीत घंटानाद केला जाणार आहे, अशी माहिती कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष अभय गट यांनी सांगितले.
शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. मात्र, संपात सहभागी होऊन शाळेत गैरहजर राहिल्यास त्याबाबतचा अहवाल सरकारला पाठविला जाणार आहे. शासनाकडून तशा सूचना आल्या आहेत.
- अशोक कडूस, शिक्षणाधिकारी माध्यमिक.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.