घारगाव - संगमनेर तालुक्यातील घारगाव, बोटा, जवळे बाळेश्वर या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनगृहे बांधण्यात आली आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ती बंद अवस्थेत आहेत.
एखाद्या दुर्घटनेत कोणाचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांसह प्रशासनाला पन्नास किलोमीटरवर संगमनेरच्या शवविच्छेदनगृहात जावे लागते. त्यामुळे तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील शवविच्छेदनगृहे सध्या ‘असून अडचण नसून खोळंबा’ ठरत आहेत.
घारगाव, बोटा व जवळे बाळेश्वर या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावे येतात. त्याचबरोबर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गही येथून जातो. सातत्याने अपघातांसह विविध दुर्घटना येथे घडत असतात. शवविच्छेदन करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनगृहे बांधलेली आहेत, मात्र अद्यापही ती बंद अवस्थेत आहेत.
ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्याचे कुटुंबीय व नातेवाईक दु:खात बुडालेले असतात. त्यातच त्यांना शवविच्छेदन करण्यासाठी पन्नास किलोमीटरवरील संगमनेरच्या शवविच्छेदनगृहात घेऊन मृतदेह न्यावा लागतो.
मृतदेह पुन्हा आणून अंत्यसंस्कार करायची धावपळ असते. परिणामी, सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे सध्या तरी असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था या शवविच्छेदनगृहांची झाली आहे. असे असतानाही याकडे कोणाचेच लक्ष जात नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील बंद असलेली शवविच्छेदनगृहे कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनगृहे बांधली आहेत. मात्र अनेक वर्षांपासून ती धूळ खात पडलेली आहेत. त्यांचा काहीच उपयोग होत नाही. आज पठार भागात एखादी दुर्घटना घडल्यास शवविच्छेदनासाठी नातेवाइकांना मृतदेह संगमनेरला न्यावा लागत आहे. त्यामुळे मृतदेहांची हेळसांड होते. यामध्ये गोरगरिबांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर स्वीपरची जागा भरावी.
-किशोर डोके, मनसे जिल्हा संघटक, उत्तर नगर- रस्ते साधन सुविधा व आस्थापना
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनगृहे आहेत, मात्र शवविच्छेदन करण्यासाठी माणूस नाही. आरोग्य केंद्रांमध्येही कर्मचार्यांची संख्या खूप कमी आहे. घारगाव येथे शवविच्छेदनगृहासाठी जागा भरली गेली, तर संगमनेरला जावे लागणार नाही.
- नितीन आहेर, सामाजिक कार्यकर्ते
घारगाव, बोटा व जवळे बाळेश्वर या तीनही ठिकाणी शवविच्छेदनगृहे बांधल्यापासून बंदच आहेत. शवविच्छेदनासाठी स्वीपरची जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे बंद शवविच्छेदनगृहांची दुरवस्था होत चालली आहे.
-डॉ. प्रल्हाद बांबळे, वैद्यकीय अधिकारी, जवळे बाळेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.