Rama shot an arrow and made a hot spring at Dongargan for Sita's bath 
अहिल्यानगर

वनवासात सीतेच्या अंघोळीसाठी रामाने बाण मारून केला होता गरम पाण्याचा झरा, आजही वाहते पाणी

चंद्रभान झरेकर

अहमदनगर ः नगर-वांबोरी रस्त्यावर नगर शहराच्या उत्तरेस हे टुमदार गाव आहे. या गावाच्या उत्तरेला डोंगरदऱ्यांमध्ये श्रीरामेश्वराचे देवस्थान आहे. आकाशाशी स्पर्धा करणारे उंचच उंच डोंगर, वृक्ष आणि पाताळाचा वेध घेणाऱ्या खोल दऱ्या अशा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या भूमीला पौराणिक व ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी शरभंग ऋषींचा आश्रम असल्याने हा परिसर दिव्य आहे. 

डोंगरगणच्या या ऐतिहासिक स्थळी महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामींचेही वास्तव्य अनेक दिवस होते. त्यांनीही या ठिकाणी तपश्‍चर्या करून या पावन भूमीचे तेज वाढविले. श्रीरामेश्वर मंदिरामागे श्रीचक्रधर स्वामींचे मंदिर आहे. महानुभाव पंथाचे भाविक देशभरातून या ठिकाणी दर्शनास येतात. गर्भगिरी ही सह्याद्रीची शाखा आहे. 

नगर तालुक्‍यातील डोंगरगण ते बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्ही या गावादरम्यान सुमारे 160 किलोमीटर अंतराचा गर्भगिरी डोंगराचा पट्टा आहे. देवादिकांच्या, संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी स्वर्गासारखी सुंदर आहे. डोंगरगण तीर्थक्षेत्रासोबतच पर्यटनस्थळ म्हणूनही नावारूपाला आले आहे. नगर शहरवासीयच नव्हे, तर जिल्हाभरातून येथे भाविक व पर्यटक गर्दी करतात. तेथील निसर्गसौंदर्य पाहून ब्रिटिशही भुलले होते. हॅपी व्हॅली म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी डोंगरगणला नावाजलं होतं. नगरच्या गॅझिटिअरमध्येही या ठिकाणाचा उल्लेख आहे. त्यामुळेच तेथे सरकारी विश्रामगृहही त्या वेळी बांधण्यात आले होते. तीन मजली हवा महाल बांधला. तेथे थंड व आल्हाददायक वातावरण असते. 

रामेश्वर मंदिरासमोर निजामकालीन संपूर्ण दगडी बांधकाम असलेली 30 फूट उंच व 150 फूट लांब अशी भव्य दोन मजली इमारत आहे. निजामकाळात हा हवामहाल होता. विविध अधिकारी, राजकीय नेते, पर्यटक यांना या इमारतीचा निवासस्थान म्हणून उपयोग होत आहे. 

आनंद दरीच्या दक्षिणेला असलेला हा हवा महाल आजही सुस्थितीत आहे. उन्हाळ्यात अनेक पर्यटक येथे सुट्यांसाठी येतात. तसेच येथील हवा महालमध्ये मुक्‍काम करतात. येथे ब्रिटिशांच्या काळात कोर्ट-कचेऱ्यांचे कामकाज चालत असे. 

प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य 
डोंगरगणचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य होते. राम-लक्ष्मण व सीतामाता चौदा वर्षांच्या वनवासात असताना ते येथील शरभंग ऋषींच्या भेटीला आले होते. येथील जंगलात शरभंग ऋषींचा आश्रम होता. तेथे आता महादेवाचे मंदिर आहे. तेथे काही काळ श्रीराम, लक्ष्मण व सीतेने वास्तव्य केल्याचा पुराणात उल्लेख आहे. त्या वेळी सीतामातेसाठी श्रीरामचंद्रांनी स्नानगृह केले होते. तसेच बाण मारून गंगा नदीतून पाणीही काढले होते. श्रीशरभंग ऋषींच्या इच्छेनुसार ते येथे थांबले होते. तसेच भगवान शंकराच्या नित्यपूजेत खंड पडू नये, म्हणून श्रीरामचंद्राने तेथे शिवलिंग स्थापन केले. त्या वेळी भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रकट झाले. त्यांनी श्रीरामांना वर दिला. येथे माझ्याअगोदर तुझे नाव घेतले जाईल. त्यामुळे येथे असलेल्या शिवलिंगाला "राम अधिक ईश्वर' असे रामेश्वर नाव पडले. हे स्थान पुढे श्रीरामेश्वर म्हणून प्रसिद्धीस पावले. श्रीराम काही काळ येथे राहिल्याने तेथे सीतेचे स्नानगृहही तयार केले होते. त्यामुळे हे स्थान "सीतेची न्हाणी' या नावाने जास्त ओळखले जाऊ लागले. 

हैप्पी व्हॅली 
जमिनीखालून भुयार असल्याने पर्यटनाच्या दृष्टीनेही हे स्थान अत्यंत सुंदर आहे. आनंद दरीची वेगळी ओळख आहे. येथे उंच-उंच वृक्ष व धबधबे आहेत. उंच डोंगर व घनदाट वनराई असल्यामुळे येथे अत्यंत आल्हाददायक वातावरण आहे. त्याचबरोबर नागमोडी वळणे घेत जाणारा घाट हेही डोंगरगणचे वेगळेपण आहे. श्रावणात निसर्ग भरभरून या भूमीच्या पदरात दान टाकतो. अर्थात, ते घेण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी येथे गर्दी करतात. डोंगरगण येथील रामेश्वराचे मंदिर अतिशय पुरातन आहे. शिल्पकलेचा नमुना या ठिकाणी पहावयास मिळतो. पुंडलिक जंगले शास्त्री यांनी गावकऱ्यांच्या मदतीने आणि लोकवर्गणीतून येथे नवीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. 

बाण मारून केला गरम पाण्याचा झरा 
मंदिरासमोर श्रीरामचंद्रांनी बाण मारून पाणी काढलेला झरा आहे. मंदिर परिसरातील विश्रामगृहाच्या मागे कारंजे आहेत, हेही येथील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात असलेल्या महादेवाच्या प्रमुख स्थानांपैकी येथे प्रभू रामचंद्राने स्थापन केलेले श्रीरामेश्वर हे प्राचीन व जागृत शिवस्थान आहे. श्रावण महिन्यातील सर्व सोमवार आणि विशेषत: तिसऱ्या व चौथ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. तसेच महाशिवरात्रीला येथील शिवदर्शनाचे विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी जिल्हाभरातून हजारो भाविक श्रीरामेश्वराच्या दर्शनास गर्दी करतात. प्रत्येक उपवास व धार्मिक विधीवेळी वर्षभर नियमित पर्यटक व भाविक या स्थानाला अवश्‍य भेटी देऊन दर्शन घेतात. 

या जागृत देवस्थानाच्या रूपात श्रीरामेश्वरधाम व ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ होतो. लाखो शिवभक्‍तांच्या मनोकामना, इच्छा श्रीरामेश्वर कृपेने पूर्ण होतात. पुरातन मंदिराच्या सभामंडपाचे काम लोकवर्गणीतून पूर्ण झाले आहे. गावातील दानशूर मंडळींसह भाविकांच्या देणगीतून या मंदिर परिसरात आणखी विकासकामे सुरू आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. जिल्हाभरातून भाविक यात्रेला गर्दी करतात. 

ज्ञानेश योग आश्रम 
या ठिकाणी पुंडलिक जंगले महाराज यांचा श्री ज्ञानेश योग आश्रम आहे. येथे साठ ते सत्तर विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात. जंगले शास्त्री महाराजांनी 1985 साली येथे श्री ज्ञानेश योग आश्रमाची स्थापना केली होती. तेव्हापासून येथे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार घडले असून, डोंगरगण गावाला धार्मिक वारसा आहे. कुठलेही शुल्क न घेता येथे मोफत आध्यात्मिक ज्ञान दिले जाते. जंगले शास्त्री महाराज राज्यभर कीर्तन, प्रवचन करून येथील संस्था स्वखर्चाने चालवितात. शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली येथे वर्षातून दोन वेळा हरिनाम सप्ताह होतात. या सप्ताहाला जिल्हाभरातून भाविक हजर असतात. 

मांजरसुभे गड 
डोंगरगणशेजारी मांजरसुभे हे गावही निसर्गरम्य वातावरण व डोंगरदऱ्यांच्या कडेला वसलेले आहे. येथे प्रसिद्ध असलेला श्रीगोरक्षनाथ गड अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. मांजरसुभेच्या उत्तरेला खोल दऱ्या आहेत. दक्षिणेला उंच डोंगर आहे. या डोंगरावर श्रीक्षेत्र गोरक्षनाथांचे भव्य मंदिर आहे. नागमोडी वळणे घेत गोरक्षनाथ गडावर जाणारा घाट पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो. डोंगरावरील उंच टेकडीवर श्रीगोरक्षनाथांचे दगडी मंदिर आहे. 

मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. तसेच येथील डोंगरावर छोटे तळे आहे. येथील डोंगरावर गोरक्षण संस्था आहे. या संस्थेत देवस्थान गायींना सांभाळतात. दिवसभर डोंगरावर चारा-पाण्याची व्यवस्था केली जाते. उन्हाळ्यात वांबोरीसह परिसरातील गावांमधील ग्रामस्थ येथील गायींसाठी चाऱ्याची व्यवस्था करतात. त्याचबरोबर मांजरसुभे परिसरात दावल मालिक नावाचा डोंगर आहे. या डोंगरावर दावल मालिक बाबांचा पीर आहे. हा पीर निजामकालीन मंदिरात आहे. डोंगरावर एकरभर क्षेत्रावर हौद आहे. येथे हत्तीच्या मोटेने पाणी सोडले जात होते, अशी आख्यायिका आहे. डोंगराच्या सर्व बाजूने खोल दरी आहे. उत्तरेकडील बाजूस डोंगराच्या अर्ध्या भागात डोंगराच्या आतमध्ये पाण्याच्या टाक्‍या कोरलेल्या आहेत. डोंगरात कोरीव काम करून या पाण्याच्या टाक्‍या तयार केल्या आहेत. येथे उन्हाळ्यातही पाणी असते. तेथे जाण्यासाठी अत्यंत छोटी पाऊलवाट आहे. या पाण्याच्या टाक्‍यातून हत्ती मोटेद्वारे गडावरील हौदात पाणी टाकले जाई. औरंगजेब बादशहा दक्षिणेकडे मोहिमेसाठी जात असताना या गडावर मुक्‍कामी थांबला होता. सकाळी उठल्यानंतर त्याने गडावर फेरफटका मारला आणि म्हटले, "वा! क्‍या मंजर ए सुभा है' यावरून या गावाचे नाव मांजरसुभे पडले. पुढे या गावाचे नाव मांजरसुंबे झाले. अशी या गावची आख्यायिका आहे. डोंगरगण व मांजरसुभे या परिसरात डोंगररांगा व दऱ्या आणि घनदाट वनराई असल्याने येथे भाविक व पर्यटकांची नेहमी गर्दी असते. नगर शहरापासून हे अंतर जवळ असल्याने शनिवार, रविवार, तसेच सुटीच्या दिवशी नियमित या परिसरात गर्दी असते. 

डोंगरगण येथील रामेश्वर मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. येथे भक्‍तनिवास व बगीचा प्रस्तावित आहे. तेथील मंदिराच्या सभामंडपाचे काम झाले. मात्र, मुख्य गाभाऱ्याची दुरुस्ती करावी लागेल. भाविकांनी वस्तू किंवा आर्थिक स्वरूपात मदत केल्यास येथील विकासकामे तातडीने मार्गी लागतील, असे रामेश्वर देवस्थानचे विश्‍वस्त राधाकृष्ण भुतकर सांगतात. 
 
पर्यटनासाठी हे करता येईल 
डोंगरगण येथे भाविक आणि पर्यटकही येतात. त्यामुळे येथे वर्षभर गर्दी असते. पुणे-मुंबईसह राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एखादे हॉटेल, लॉजिंगची व्यवस्था झाल्यास ते मुक्कामी थांबतील. येथे भक्‍तनिवास, मंदिर परिसरात बगिचा, येथील बंद अवस्थेत असलेले कारंजेही सुरू करता येतील. येथील आनंददरीतील घनदाट वनराईत छोटे-छोटे रस्ते तयार करून पर्यटनाला चालना देता येईल. वनभोजनासाठी भाविक गर्दी करतील. शरभंग ऋषींच्या आश्रमाकडे जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता तयार केल्यास भाविकांच्या संख्येत वाढ होईल. पर्यायाने परिसराचा विकास होईल. 
 
श्रीरामचंद्रांचे काचेचे मंदिर 
डोंगरगणशेजारीच पिंपळगाव माळवी गाव आहे. येथे श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीतामातेची अत्यंत सुंदर मूर्ती आहे. मुख्य गाभारा व संपूर्ण सभामंडप काचेचा आहे. हे या मंदिराचे वेगळेपण आहे. पूर्ण मंदिरात रंगीबेरंगी काचा बसविल्याने भव्य असलेले हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. येथे वर्षातून दोन वेळेला हरिनाम सप्ताह होतात. भाविकांचा तिकडे ओघ वाढला आहे. डोंगरगण, मांजरसुंभेसह हेही धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. 

कसे जाल डोंगरगणला? 
नगर शहरापासून डोंगरगण गाव केवळ अठरा किलोमीटर अंतरावर आहे. नगर-वांबोरी रस्त्यावर हे गाव आहे. शहरातील माळीवाडा, तारकपूर बसस्थानक येथून दर अर्ध्या तासाला एसटी बस तेथे जाण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच खासगी वाहनानेही येथे जाता येते. वांबोरीपासून दक्षिणेला सात किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असल्याने येथे नेहमी गर्दी असते.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT