अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात चिकुनगुणियासदृश विषाणूच्या नवीन प्रकाराने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. त्यात चिंतेची बाब म्हणजे, यात अर्धांगवायूसारख्या गंभीर आजाराचेही रुग्ण वाढू लागले आहेत.
चिकुनगुणियासारखे काही नवीन विषाणूही आढळून येत असल्याने डॉक्टरांमधून गोंधळाचे वातावरण होऊ लागले आहे. असे असले, तरी हे आजार औषधोपचाराने पूर्ण बरा होतो. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये; परंतु वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉक्टर करीत आहेत.
संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी तातडीने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) या प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली आहे. चिकुनगुणियाच्या विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.
अहमदनगर शहरासह, बीड जिल्ह्याच्या काही भागात चिकुनगुणियासदृश विषाणूंचा फैलाव वाढला आहे. यात अगोदर ताप येतो. त्यानंतर अंग दुखणे, हातापायांचे सांधे दुखतात. रुग्णांना चालणे देखील मुश्कील होते. काहींना मळमळ, उलटी असा त्रास होतो, असे रुग्णांनी सांगितले. अशा आजारामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालये फुल्ल आहेत.
पुण्यातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञांच्या मते, एकेकाळी सांधेदुखी आणि ताप यासाठी ओळखला जाणारा चिकुनगुणिया आता मोठी आणि धोकादायक लक्षणे दाखवत आहे. यापूर्वी दोन हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवलेल्या शहरात यापूर्वी कधीही न पाहिलेली लक्षणे आता या आजारात दिसत आहेत. हा विषाणू डेंगीची नक्कल करीत असल्याचा दावा केला जात आहे.
त्याच्या विचित्र लक्षणांमुळे आता डॉक्टरदेखील गोंधळले आहेत. राष्ट्रीय डेंगीतज्ज्ञ आणि केईएम हॉस्पिटलमधील आयसीयू आणि डेंगी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गादिया यांनी या संदर्भात ''सीविक मिरर''सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, की या लक्षणांपैकी सर्वात धक्कादायक लक्षण म्हणजे नाक काळे पडणे. भूतकाळातील चिकुनगुणियाचा या वैशिष्ट्याशी कधीही संबंध नाही. हे पाहता आताचा चिकुनगुणिया अधिक चिंताजनक आहे. या लक्षणामुळे रुग्णांना सुमारे दोन आठवडे चालणे-फिरणेदेखील कठीण होत आहे.
चिकुनगुणिया साधारणपणे एडिस नावाच्या डासांपासून होतो. शहरी व ग्रामीण भागात काहीसे वेगळे प्रकार आढळतात. पूर्वी चिकुनगुणिया आजार लवकर बरे होत होते. सध्या मात्र असे ६० टक्के रुग्ण एका महिन्यात बरे होतात. २५ रुग्णांना तीन महिने लागतात, तर १५ टक्के रुग्णांना संधिवात आजार होतो. विशेष म्हणजे याचा मेंदूवर आघात होत असून, त्याचा प्रभाव मेंदू, चेहऱ्यावर रॅश येणे, पायांना सूज येणे असे लक्षणे वाढू लागले आहेत. त्यावर पर्याय म्हणजे असे लक्षणे दिसू लागल्यास वैद्यकीय सल्ल्याने आवश्यक पॅरासिटॅमॉल घेणे, भरपूर पाणी पिणे, आवश्यक व्यायाम करणे आहे.
- डॉ. गोपाल बहुरुपी, संधिवाततज्ज्ञ
जिल्ह्यात सध्या व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण आढळत आहेत. चिकुनगुणिया, डेंगी, गोचिड ताप आदींची लक्षणे असल्यास रुग्णांनी तातडीने डॉक्टरांकडून तपासणी व औषधोपचार करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आरोग्यविषयक विशेष नियोजन केले जात आहे. नवीन आजारांना घाबरू नये; परंतु काळजी घ्यावी.
- बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी
अर्धांगवायूची लक्षणे
गादिया यांच्या म्हणण्यानुसार, धोकादायक लक्षण म्हणजे अनेक चिकुनगुणिया रुग्णांमध्ये अर्धांगवायूची लक्षणे दिसत आहेत. चिकुनगुणियामुळे इतकी गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णांच्या मज्जातंतूचे नुकसान होत आहे आणि अनेकांना अर्धांगवायू होत आहे. माझ्या ओपीडीमध्ये याच्या दररोज सरासरी ३० नवीन केसेस येत आहेत. चिकुनगुणियाची लक्षणे आता डेंगीच्या लक्षणांशी साधर्म्य साधणारी आहेत. लक्षणांच्या या नकलेमुळे वैद्यकीय तज्ज्ञांचा गोंधळ उडत असल्याचा दावा देखील डाॅ. गादिया यांनी केला.
जानेवारी ते सप्टेंबर दरम्यानचे रुग्ण
हिवताप तपासणी ४७९१५७ (बाधीत रुग्ण १)
डेंगी तपासणी १२४९ (बाधित २३०)
चिकुनगुणिया तपासणी ५२ (बाधित २५)
झिका - रक्त नमुने तपासणी ३२३ (बाधित ११)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.