अहमदनगर : ‘शिर्डीस ज्याचे लागतील पाय! टळतील अपाय सर्व त्याचे’ साईबाबांचे शिर्डीसह जगभरातील भाविकांसाठी वचन होते. शिर्डी साईबाबांच्या नावाने ओळखली जाते. तिची कीर्ती जगभर पसरली.
दिंड्या, सायकल, गाड्याघोड्या, रेल्वे असो की विमान कोणत्याही मार्गाने भक्तांना शिर्डी गाठायची असते, मन भरून बाबांचे दर्शन घ्यायचे असते. एक ऊर्जा घेऊन प्रत्येक साईभक्त परततो. जो कोणी या पवित्र भूमित येतो, त्याला प्रचिती येत असेल. मनोकामना पूर्ण होत असेल. काही भक्त असे असतात की ते देवाकडे काही मागत नाही. त्यांना आशीर्वाद हवा असतो.
ज्या बाबांनी रंजल्यागांजल्यांची सेवा केली, त्यांनी कधी कोणालाही म्हटले नाही की मला देव म्हणा. माझी पूजा करा. त्यांचा संदेश मानवकल्याणाचा होता. तरीही काही विघ्नसंतोषी लोक म्हणतात ते देव नव्हते. ते हिंदू नव्हते म्हणून त्यांच्या अनेक मुर्ती वाराणसीत हटविण्यात आल्या, मात्र अशा मंडळींना कोण सांगणार की शिर्डीत आजही ९९ टक्के भक्त हिंदूच येतात. सवंग लोकप्रियतेसाठी नौटंकी करणाऱ्यांना खरा देव तरी कळला का?
आजकाल झाले असे आहे की काही दिशाहीन मंडळी एखादा विचार पुसून टाकण्यासाठी खूप उताविळ झालेले दिसतात. जगात असा कोणी माणूस आहे का जो परिपूर्ण आहे. प्रत्येक माणसात काही तरी उणीव असते. चूकत नाही, असा माणूस तरी शोधून दाखवा. जगभरात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, अब्राहम लिंकन, मार्टिन ल्यूथर किंग असतील किंवा नेल्सन मंडेला असतील. त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.
आपल्या ध्येयापासून ते कधी दूरही गेले नाहीत. एखाद्याला काय वाटते, त्यापेक्षा आपण जे कार्य करतो, लोकांना न्याय देतो, संघर्ष करतो, त्याला कशाचेही भय वाटत नाही, अशा मंडळींनी इतिहास घडविला. वेडीच माणसं इतिहास घडवतात हा जगाचा अनुभव आहे. मानापमान, अन्यायापासून देवादिकांची तरी कुठे सुटका झाली. हे सांगण्यामागचे कारण असे आहे की एखाद्या मूर्खाने उठावे आणि काही करावे. मूर्ती हटवाव्यात, त्याने साईबाबांचे महत्त्व कमी थोडे होते. संत तुकारामांची ज्यांनी गाथा बुडविली, त्यांना कोणी ओळखत नाही. पण, तुकोबाराय जगद्गुरू म्हणून विश्र्वाला ज्ञात आहेत.
महात्मा गांधींचे विचार पटत नाही म्हणून त्यांच्या पुतळ्याला पुन्हा गोळ्या घालणारे विकृतही आहेतच ना!. स्वत:ला अभिप्रेत असलेले रंग पुतळ्याला फासणारे महामूर्ख आहेत. हे सगळं सांगण्याचे कारण असे की ज्या काळात जे थोर पुरुष होऊन गेले, त्यांनी जे कार्य केले, त्याची प्रेरणा घेऊन आपली वाटचाल सुरू ठेवायची असते. कोणताही विचार गोळ्या घालून, गाथा बुडवून, पुस्तक जाळून किंवा मुर्ती हटवून संपत नाही.
साईबाबा हे असे संत होऊन गेले की त्यांच्यावर सर्व जातीधर्मांच्या लोकांची श्रद्धा होती, आहे आणि उद्याही राहिल. मागे एक शंकराचार्य म्हणाले होते, साईबाबा देव नाहीत. पण, त्यांना कोण सांगणार की बाबांनी असे कधी म्हटले होती की मला देव माना. मी देव आहे. त्या काळात बाबांच्या भेटीला गावगाड्यातील लोक येत. त्यांचे दर्शन घेत. खुद्द लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती, हे सर्व आपण विसरायचे का? साईचरित्र काय सांगते? श्रद्धा आणि सबुरीचा संदेश त्यांनी दिला. आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक माणूस स्पर्धा करीत आहे. त्याला झटपट सगळं हवं असतं अशावेळी आजही ‘श्रद्धा आणि सबुरी’ उपयोगी पडते की नाही?
साईबाबांना देव माना, नका मानू, त्यांच्या मूर्ती हटवा किंवा त्यांना जाती-धर्माची लेबलं लावा, त्याने साईभक्तांवर काही परिणाम होणार नाही. साईभक्तांची सबुरीवर श्रद्धा आहे. बाबांच्या झोळीत भक्त जे दान टाकतात, ती दररोज भरून जाते. या पैशातून साई संस्थान रंजल्यागांजल्यांची सेवा करते. लाखो लोक प्रसाद घेतात. रुग्णांना मदत होते. किती उपक्रम सांगावे. इतके होऊनही दररोज दानपेटीतील धन कधीच कमी होत नाही. साईबाबा म्हणत,‘माझ्या समाधीची पायरी चढले! दु:ख हे हरेल सर्व त्याचे!’ प्रत्येक भक्ताचे अश्रू पुसण्याचे, त्याच्या जीवनात आनंद कसा येईल, सुखी-समाधानी कसे राहील यापेक्षा साईबाबांना कोणती अपेक्षा होती. शेवटी प्रश्न उरतोच. बाबांनी स्वत:साठी काय मागितले!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.