शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना तालुक्यातून तब्बल ५४ हजारांचे मताधिक्य मिळून ते पुन्हा एकदा खासदार झाले. या मतांच्या आघाडीत आमदार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघात थोरात म्हणतील त्याच उमेदवाराच्या गळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ पडणार, असे मानले जाते.
वाकचौरे यांच्या विजयाने तालुक्यात महाविकास आघाडीतून विधानसभेसाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर तळपाडे, काँग्रेसचे सतीश भांगरे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, तर राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) आमदार डॉ. किरण लहामटे, भाजपचे माजी आमदार वैभव पिचड अशी, तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे.
अकोले तालुका हा माजी मंत्री मधुकर पिचड यांना मानणारा होता. सात वेळा विधानसभेत विजयी होऊन मंत्री, विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष होऊन तालुका राज्याच्या पटलावर नेला, तर खासदारकीची निवडणुकीतही तालुक्यातून ते ज्या पक्षात, त्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळत असे. मात्र, अलीकडे गणिते बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.
त्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सरकार राज्यात आले. तालुक्यात खासदार व आजी, माजी आमदारांनी विकासकामे आणली. अगस्ती कारखान्यासाठी ११० कोटी रुपये आणले. त्यामुळे तालुक्यात युतीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यामागे तालुक्यातील माजी मंत्री, ‘अगस्ती‘चे अध्यक्ष सीताराम गायकर, ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ, बाजीराव दराडे आदी नेते ताकदीचे उभे राहतील व ते ५० हजारांचे मताधिक्य घेतील, असे चित्र होते. मात्र, तसे घडले नाही. त्याउलट माजी मंत्री
बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमित भांगरे, सुनीता भांगरे, मधुकर तळपाडे, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, सतीश भांगरे, डॉ. अजित नवले, मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, दिलीप भांगरे यांनी गाव, वाडी-वस्ती पिंजून काढून मतदान घडवून आणले. उमेदवार वाकचौरे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे त्यांनी तालुक्यात ५४ हजार मतांची आघाडी घेत आपला विजय खेचून आणला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री थोरात सांगतील त्याला विधानसभेची उमेदवारीची संधी मिळण्याची संधी निश्चित मानली जाते.
एका अर्थाने लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीमच होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांतील अंतर्गत वाद, मानापमान नाट्य, सदाशिव लोखंडे यांचा कमी असणारा जनसंपर्क व वाकचौरे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी, संविधान बदलणार असल्याचा प्रचार व त्यामुळे मुस्लिम, मागासवर्गीय, मराठा मतदारांचे वाढलेले मतदान व मतांचे झालेले ध्रुवीकरण वंचित आघाडीला मिळालेली अल्प मते, याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाला.
लोखंडेंचे मताधिक्य घटले
२०१९ च्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ४९५१५, तर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना १०३५६, काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे याना सर्वाधिक ८११६५ मते मिळाली होती. २०२४ मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना ९३०२५, तर शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांनी ३८६४६ इतके मते मिळवली. सुमारे ५५ हजार ३७९ मताधिक्य मिळवत वाकचौरे यांनी मुसंडी मारली. लोखंडे यांना २०१९ पेक्षा १० हजार ८६९ मते या निवडणुकीत कमी पडली आहेत.
महायुतीची उदासीनता नडली
महायुतीचा प्रचारात व मतदान घडविण्यात उदासीनपणा जास्त जाणवला. त्यामुळे युतीच्या उमेदवाराला तालुक्यात अधिक मते मिळाले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.