shiv jayanti 2023 safforn flag sale muslim community ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : स्वराज्याच्या भगव्यावरच मदारींची भाकरी

अनोखी शिवजयंती; परांड्याच्या मुस्लिमांची दोन पिढ्यांपासून ध्वजविक्री

अशोक निंबाळकर

अहमदनगर : रंगावरून आणि झेंड्यावरून दोन धर्मांतील काही लोकांची मने काळवंडली आहेत. सध्या देशात रंगाचे राजकारण जोमात आहे. मात्र, त्याला परांड्याच्या तब्बल शंभर मदारी कुटुबांची शिवभक्ती चपराक आहे.

ही मुस्लिम कुटुंबे तब्बल दोन पिढ्यांपासून स्वराज्याच्या भगव्या ध्वजावर अवलंबून आहेत. शिवजयंतीला महाराष्ट्रभर ते ध्वजविक्री करतात. त्यांची रोजीरोटीच या झेंड्यांवर अवलंबून आहे. हे आमचे शिवप्रेम असल्याचे ते मानतात.

सोलापूर जिल्ह्यातील परांडा गावात मदारी समाजाची शंभर कुटुंबे आहेत. वर्षभर त्यांचे झेंडे आणि गोंडेविक्रीचे काम चालते. शिवजयंती जवळ आली, की ही कुटुंबे सातारा, पुणे, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत जातात.

तेथे रस्त्याच्या कडेला अथवा जागा मिळेल तेथे स्टॉल लावतात. भगवे झेंडे, बॅनर, बिल्ले आदी साहित्याची ते विक्री करतात. बहुतांश जिल्ह्यांत त्यांच्या स्टॉलची जागा ठरलेली आहे. शिवप्रेमी दर वर्षी त्यांच्याकडूनच साहित्य खरेदी करतात.

येथील एमआयडीसी चौकात परांड्याच्या सिकंदर मदारी यांचा ध्वजविक्रीचा स्टॉल आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मदारींचे शिवप्रेम समोर आले. गेल्या वीस वर्षांपासून ते येथे ध्वजविक्रीस येतात. नगरमध्ये प्रारंभी मदारी कुटुंबेच शिवजयंतीस ध्वजविक्री करायचे. आता जागोजागी स्टॉल आले आहेत. मात्र, मदारींच्या स्टॉलवरच शिवप्रेमींची वर्दळ असते.

शिवजयंतीव्यतिरिक्त ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती, पुण्यतिथीस ध्वजविक्री करतात. एकलव्य जयंतीसही ते ध्वज उपलब्ध करून देतात. जयंतीनंतर ते लगेच गोंडे तयार करण्याकडे वळतात. उसाचा ट्रॅक्टर, तसेच मालमोटार सजवण्यासाठी लागणारा साज ते तयार करतात. हेच त्यांचे प्रमुख साधन आहे.

देशातील रंगाच्या राजकारणाचे त्यांना काही घेणे-देणे नाही. आम्ही हा झेंडे-गोंडेविक्रीचा व्यवसाय आनंदाने करतो. आमची भाकरीच त्यावर अवलंबून आहे. ज्यांची पोटं भरलीत त्यांना ते राजकारण सुचत असेल, अशी प्रतिक्रिया मदारी देतात. ती अंतर्मुख करून जाते.

मदारी मेहतर यांची परंपरा

छत्रपती शिवाजी महाराज यांना मदारी मेहतर यांची मोठी साथ लाभली. इतिहासात तसे दाखले आहेत. तोच शिवप्रेमाचा वारसा आम्ही जपत आहोत, असे सिकंदर मदारी सांगतात. आम्ही आजही दुर्लक्षित आहोत.

सरकारने आम्हाला घरकुलेही दिलेली नाहीत. मात्र, आमच्या समाजात तुम्हाला एकही जण चोरी, गुन्हेगारीत सापडायचा नाही. कष्ट करूनच आम्ही पोट भरतो, असे ते अभिमानाने सांगतात.

पारंपरिक खेळ

मदारी समाज माकड आणि सापांचा खेळ करायचा, परंतु त्यावर सरकारने निर्बंध आणल्यापासून या कुटुंबांची वाताहत झाली. बहुतांश कुटुंबे ध्वजविक्रीच्या व्यवसायात उतरली. हाताला मिळेल ते काम ते करतात. मात्र, त्यांनी पोटासाठी कधीही गुन्हेगारीचा मार्ग पत्करला नाही. नाकारलेपणाचे जिणे जगत असतानाही त्यांच्यातील सहृदयता लोप पावलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT