नेवासे शहर : नेवासे शहरातील नगरपंचायत चौकात पोस्ट ऑफिस व मुख्य रस्त्यावर असलेल्या चौदा दुकानांना शुक्रवारी (ता.२६) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीमध्ये सर्व दुकाने जळून खाक झाली. त्यामध्ये १ कोटी १५ लाखांचे नुकसान झाले. एका दुकानात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
शहरात नगरपंचायत चौकातील पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या व चौकातील डाव्या बाजूला असलेल्या दुकानांना आग लागल्याचे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास काही लोकांना निदर्शनास आले. नागरिकांनी भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला या घटनेची खबर दिली.
तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. आग आटोक्यात येइपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. याप्रकरणी पशु खाद्य दुकानचालक प्रकाश सदाशिव साळुंके यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
प्रकाश सदाशिव साळुंके यांच्या ज्ञानेश्वर ट्रेंडिंग कंपनीचे पंचवीस लाखांचे नुकसान झाले. सरकी पेंड, भुसा, फर्निचर जळाले. राम अरविंद शेजुळ यांच्या शिवशक्ती आईस्क्रिमच्या दुकानाचे दोन लाख, सचिन अशोक बोरुडे यांच्या प्रभात हेअर ड्रेसर्स दुकानाचे दीड लाख, रिजवान सादिक सय्यद यांचे स्टार केक शॉपचे ७ लाखांचे नुकसान झाले.
महेश अशोक शेजुळ यांचे लकी मेन्स पार्लरचे पन्नास हजार, विनायक शंकर तंटक यांच्या लक्ष्मी अलंकारचे एक लाख, अफरोज पठाण यांच्या शृंगार दुकानाचे एक लाख, जालिंदर शेंडे यांच्या चप्पल दुकानचे दोन लाख, गणेश व्यवहारे यांच्या फुल दुकानाचे पन्नास हजार, लक्ष्मण निवृत्ती रासने यांच्या आशा जनरल दुकानाचे पाच लाख,
नरहरी रघुनाथ शेजुळ यांच्या नम्रता सलूनचे पन्नास हजार, जावेद शेख यांच्या मोबाईल शॉपीचे एक लाख, सुनील बोरुडे यांच्या सलूनचे पन्नास हजार, राजेंद्र चांदणे यांच्या मोबाईल शॉपीचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत. पहाटेपासून दुकानांना लागलेली आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.