पाथर्डी ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना शहरातील पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने वीस हजार लोकांचा पाणीपुरवठा गेल्या सात दिवसांपासून बंद आहे. उन्हाळ्याचे दिवस व त्यात "लॉकडाउन' असल्याने पाणी चढ्या भावाने विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या योजनेच्या देखभाल- दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेकडे आहे. महामार्गाच्या ठेकेदाराचे कामगार पळून गेले आहेत.
नगरपालिकेने हे काम करून घेण्यासाठी पाठपुरावा केला, तरीही पाणीटंचाई दूर झाली नाही. शहराचा गावठाण भाग वगळता, रावसाहेब म्हस्के कॉलनी, नाथनगर, आनंदनगर, वामनभाऊनगर, शंकरनगर, फुलेनगर, एडके कॉलनी, मेहेर टेकडी, विजयनगर, सपकाळ वस्ती, बोरुडे वस्ती या भागात गेल्या सात दिवसांपासून पाणी नाही.
रामगिरीबाबा टेकडीवरून पोलिस लाइनकडे असलेल्या टाकीकडे जाणारी पाण्याची पाइपलाइन खेडकर हॉस्पिटलसमोर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना फुटली. तेथे लागणारा सिमेंट पाइप मिळत नाही, असे कारण सांगितले गेले. ठेकेदाराची माणसेही गायब झाली. अखेर नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, महेश बोरुडे यांनी ठेकेदाराकडे पाठपुरावा करून पाइपलाइन दुरुस्तीचे काम मार्गी लावले.
मात्र, सात दिवस पाथर्डीत वीस हजार लोकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. पाणी मिळण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत. एकाच वेळी सर्व भागांत पाणी देणेही पालिकेला शक्य नाही. नागरिकांनी खासगी टॅंकरचे पाणी विकत घेतले. जिल्हा परिषदेचा ठेकेदारही काम करण्यास असमर्थता दर्शवीत आहे. पालिका म्हणते, "आम्ही जिल्हा परिषदेचे ग्राहक आहोत. त्यांनी दुरुस्ती केली पाहिजे.' यामध्ये सात दिवस काम पडून होते. ठेकेदार व त्यांच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
शहराच्या उपनगरांतील पाणीपुरवठा सात दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. उन्हाळ्यात व "लॉकडाउन'च्या काळात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा. लोकांना "लॉकडाउन'मुळे आंदोलनही करता येईना.
- बंडू बोरुडे, नगरसेवक पाथर्डी
महामार्गाच्या ठेकेदाराकडून पाइपलाइन फुटली त्यांनी दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांची दिरंगाई सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. शनिवारी काही भागाला पाणी मिळेल. दोन दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत होईल.
- धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, पाथर्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.