अहमदनगर : अहमदनगरसह, नाशिक, औरंगाबाद आणि जालना शहरात चार चाकी, दुचाकी आणि घरफोड्या करणारा सराईत आरोपी संजय रावसाहेब चव्हाण (रा. ब्राम्हणगाव, ता. श्रीरामपूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील सहा वाहने हस्तगत केली आहे.
श्रीरामपूर शहरातील रहिवाशी सादिक इब्राहिम पठाण (वय 49, रा. काझीबाबा रोड, सुलताननगर, श्रीरामपूर) यांचे सुपर ऑटो कंसल्ट या नावाने पराग टॉवर्स, श्रीरामपूर येथे जुने चारचाकी वाहनांचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे ओळखीचे जनार्दन रामचंद्र बाबर (रा. भिंगार, ता.नगर) यांनी त्यांची महिंद्रा बोलेरो मालवाहतुक गाडी (क्र. एमएच 16एवाय 4790) ही विक्री करण्यासाठी गाडीचे कागदपत्रासह पठाण यांच्याकडे दिली होती. पठाण यांनी सदरची पिकअप श्रीरामपूर येथील कार्यालयाचे समोर उभी केली असताना ता. 16 नोव्हेंबर रोजीचे रात्री कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे स्वतंत्र पथक आरोपींचा शोध घेत होते. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी संजय रावसाहेब चव्हाण (रा. ब्राम्हणगांव, ता. श्रीरामपूर) याने व त्यांचे साथीदारांनी मिळून केला आहे. स्थानिकच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, मनोज गोसावी, संतोष लोढे, दिपक शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, रवींद्र घुंगासे, रणजीत जाधव, सागर ससाणे, जालिंदर माने, उमाकांत गावडे, भरत बुधंवत आदींनी आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने शेवगाव, नेवासे, सोनई, अंबड ( जि. जालना), पैठण (जि. औरंगाबाद) या भागातून यापूर्वी डीव्हीआर, मोबाईल, कॉम्प्युटर, दुचाकी, पिकअप अशा वाहनांची व साहित्यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन चारचाकी वाहने, बुलेट, दुचाकी, घरफोड्यातील संगणक असा सुमारे 14 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.