नेवासे : नुकत्याच जाहीर झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालात नेवासे तालुक्यातील कुकाणे येथील विनायक कारभारी नरवडे यांनी देशात ३७ वा तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला.
विनायकच्या यशाची बातमी समजताच कुकाण्यात आनंदोत्सव साजरा केला. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार (ता.२४) रोजी लागला. त्यामध्ये कुकाणेतील प्रसिद्ध डॉ. नरवडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. कारभारी नरवडे यांचे चिरंजीव विनायक नरवडे यांनी देशात ३७ वा तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. विनायक यांचे प्राथमिक शिक्षण येथील आठरे पब्लिक स्कुल तर उच्च माध्यमिकचे शिक्षण सारडा महाविद्यालयात आणि उच्च शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे झाले.
अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर विनायक यांनी अभियांत्रिकीचे पुढील उच्च शिक्षण(एम एस इंजिनिअरिंग) अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीत पूर्ण करून अमेरिकेत एक वर्ष नोकरी केली. मात्र, प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय निश्चित केलेल्या विनायक नरवडे हे दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आले. त्यांनी तीन महिने दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास केला. मात्र कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर त्यांना नगर येथे यावे लागले. दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीचा गड राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होत सर केला आहे.
कौतुकाचा वर्षाव
शुक्रवारी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विनायक नरवडे यांनी यश संपादन केल्याची माहिती मिळताच कुटुंबियासह गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच त्यांचे कौतुक ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, ॲड. देसाई देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, युवा नेते उदयन गडाख, नागेबाबा समूहाचे प्रमुख कडूभाऊ काळे, सरपंच लता अभंग यांनी केले.
माझ्या यशात माझे गुरुवर्य, आई पुष्पा, वडील डॉ. कारभारी नरवडे यांनी दिलेले बळ मोलाचे आहे. यश मिळविण्यासाठी नियमिपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यातून कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते. अपयश आल्यास विद्यार्थ्यांनी खचू नये. पुन्हा जिद्दीने अभ्यास करावा. त्यामुळे निश्चित यश मिळते.
- विनायक नरवडे,
कुकाणे, ता. नेवासे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.