अहमदनगर : महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा आहे. या राज्यातून ऑलिम्पिकचा विजेता झाला पाहिजे. नगरमध्ये आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. येथील वाडिया पार्क स्टेडिअम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करू. पुढची स्पर्धा याच मैदानावर होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना व जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने नगरमध्ये छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील अंतिम कुस्ती विजेता सोलापूरचा महेंद्र गायकवाड याला अर्धा किलो सोन्याची गदा फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, भाजपचे सुवेंद्र गांधी,
तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, अनिल शिंदे तसेच मान्यवर या वेळी उपस्थित होते.
प्रारंभी महसूलमंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी भाषणातून वाडिया पार्क हे ऐतिहासिक आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत करून आवश्यक तो निधी द्यावा, अशी मागणी केली.
फडणवीस म्हणाले, की कुस्ती स्पर्धेला छत्रपती शिवराय यांचे नाव दिले, ही महत्त्वाची बाब आहे. कारण शिवाजी महाराजांनीच कुस्ती या खेळाला राजाश्रय दिला. यापूर्वी महाभारतात बलराम, भीम यांनी कुस्ती खेळल्याचे संदर्भ आहेत. तथापि, शिवाजी महाराजांनी या खेळाला अधिक महत्त्व दिले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी या खेळाला अधिक महत्त्व देऊन तालीम सुरू केल्या. कुस्ती आखाड्यात चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू झाली. ती आता सोन्याच्या गदेपर्यंत पोचली, ही बाब कौतुकास्पद आहे.
आमदार शिंदे यांनी भाषणातून मान्यवरांचे स्वागत केले. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत सचिन जाधव यांनी केले. प्रास्ताविक ॲड. अभय आगरकर यांनी केले. ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी नगरला एक हजार कोटी द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.