वाशीम : दरवर्षी शिक्षकदिनी वितरीत होणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुरस्कारासाठी सर्व निकषांमध्ये पात्र असतांनाही केवळ वशिलेबाजी न लावल्यामुळे गुणांकणात हेराफेरी करून डावलल्याचा आरोप जिल्ह्यात उपक्रमशील शिक्षिका म्हणून परिचित असलेल्या शिक्षिकेने केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग अशा अनुक्रमे दोन विभागातून जिल्हास्तरावरून प्रत्येकी एका शिक्षकाची निवड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कारासाठी केली जाते. या पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
सदर पुरस्कारासाठी पात्र होण्यासाठी अनेक शिक्षक जीवाचे रान करत असतात. विविध उपक्रम राबवून, कौशल्य वापरून मेहनत घेतात. यानंतर पुरस्कारासाठी अर्ज करतांना त्यांना विविध निकषानुसार माहिती सादर करावी लागते. त्यानंतर जिल्हास्तरावरील निवड समितीकडून अहवाल गेल्यानंतर राज्य शासनाकडून निवड समितीमार्फत पुरस्कारासाठी पात्र ठरल्याची यादी प्रकाशित केली जाते.
सन 2022 - 23 च्या पुरस्कारामध्ये पात्र शिक्षकांची नावे नुकतीच जाहीर झाली आहेत. यामध्ये वाशीम जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक असे दोन शिक्षक पात्र ठरले आहेत. मात्र सदर निवड करतांना बरेच गौडबंगाल झाल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात सुरू होती.
याला दुजोरा मिळणारी बाब म्हणजे प्राथमिक विभागातून पुरस्कारासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रस्ताव सादर करीत असलेल्या एका आदर्श उपक्रमशील शिक्षिकेने पुरस्कारार्थी शिक्षकाची निवड करताना आपल्याला कशा प्रकारे डावलले, गुणांकणामध्ये कशी हेराफेरी करण्यात आली. याबाबतचा पाढाच ता. 1 सप्टेंबर रोजी शिक्षण उपसंचालकांना मेलद्वारे पाठविलेल्या तक्रारीत केला आहे.
या तक्रारीत त्यांनी या पुरस्कारासंबंधीत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून खोटी कागदपत्रे सादर केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. जिथे शिक्षणाची ज्ञानगंगा या देशात आणणाऱ्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच भारतरत्न पुरस्कारापासून वंचित आहेत.
तिथे माझ्यासारख्या सामान्य शिक्षिकेला दाद कोण देणार? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून माझ्या तक्रारीची योग्य चौकशी होईपर्यंत पुरस्कार वितरित करू नये अशी मागणी शिक्षण उपसंचालकांना केली आहे.
यासोबतच त्यांनी काही इतर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय मुलाखत समितीमध्ये दरवर्षी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बदलणे गरजेचे असतांना तीन वर्षांपासून का बदलला नाही,
शासन नियमानुसार गुणांकन पडताळणी तक्ता शिक्षण विभागाच्या कार्यालयात का लावला नाही किंवा संबंधित शिक्षकास का कळविला नाही, शाळेवर प्रत्यक्ष भेट न देता व गुणवत्ता न तपासताच अध्ययन निष्पत्तीचे गुण का दिले गेले यासह अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
उपक्रमशील आणि तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या शिक्षिकेला अशा प्रकारे डावलले जात असल्यामुळे आजतागायत इतर कुठल्याही शिक्षिकेने या पुरस्कारासाठी अर्ज केला नसल्याची बाब पुढे आली आहे.
ज्ञानार्जन करून अनेक पिढ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांना आदर्श ठरवितांना होत असलेल्या हेराफेरी मुळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. या तक्रारीनंतर प्राथमिक व माध्यमिक विभागातून पुरस्कारासाठी डावलले गेलेले दोन्हीही शिक्षक दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याची चर्चा आहे.
या प्रकारामुळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करणाऱ्या एकूणच यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये होत असलेल्या या प्रकारामुळे भविष्यात आदर्श शिक्षक हा किताब घेण्यासाठी शिक्षक पुढे सरसावतील का? हे येणारा काळच ठरवेल !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.