मेहकर : जिल्ह्यातील नाफेडच्या ११ खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या सात हजारापेक्षा अधिक शेतकर्यांचा हरभरा अद्याप हमीभावाने खरेदी करणे बाकी आहे. तरी,सुद्धा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होत आल्याचे कारण दाखवून नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी मोठया अडचणीत सापडले आहे.
जिल्हा पणन अधिकारी यांनी नाफेडच्या जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्रांना २३ मेस पत्र पाठवून नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा हरभरा खरेदी करणे बंद करण्याचे आदेश दिले. वास्तविक नाफेडने हरभरा विक्रीसाठी २९ मेस ही शेवटची मुदत दिलेली होती. जिल्ह्यातील केंद्रांनी १७ मे या नोंदणीच्या अखेरच्या तारखेपर्यंत शेतकर्यांची नोंदणी केलेली असून त्यांना हरभरा विक्रीसाठी कोणत्या दिवशी आणायचा याबाबत मेसेजही पाठविले आहे. मेहकर येथील शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या नाफेडच्या केंद्रावर अनेक शेतकर्यांनी हरभरा विक्रीसाठी आणला. परंतु, जिल्हा पणन अधिकार्यांचे आदेश दाखवत त्यांचा शेतमाल घेतला जाणार नसल्याचे सांगण्यात आल्यावर शेतकर्यांनी गोंधळ करत हरभरा घेण्याची मागणी केली.
तुमचा माल इथेच राहू द्या आदेश आल्यावर खरेदी करू असे केंद्र प्रमुखांनी सांगितल्यावर शेतकर्यांनी हरभरा पोती केंद्राच्या आवारात ठेवून ते निघून गेले. मेहकर केंद्रावर नोंदणी केलेल्या ५८८ शेतकर्यांचा १७ हजार क्विंटल हरभरा अद्याप विक्री करणे बाकी आहे. जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघाची मेहकर, लोणार, बुलडाणा, देऊळगावराजा, शेगाव, संग्रामपूर या ठिकाणी नाफेडची खरेदी केंद्र असून वरवट बकाल, गजानन शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, जिजाऊ शेतकरी कृषी उत्पादक कंपनी सिंदखेडराजा, स्वराज शेतीपूरक संस्था चिखली, सोनपाऊल कृषी उत्पादक संस्था साखरखेर्डा ही अन्य केंद्रे आहे. राज्यात ६.७५ लाख मॅट्रिक टन हरभरा खरेदीचे नाफेडचे उद्दिष्ट होते.
आतापर्यंत ६ लाख मॅट्रिक टन खरेदी पूर्ण झाली आहे. शेवटच्या शेतकर्याचा हरभरा हमीभावाने खरेदी केला जाईल अशी घोषणा शासनाच्या पणन मंत्रालयाने केली होती. खरेदी केंद्रे मुदतपूर्व बंद करण्याच्या आदेशामुळे या घोषणेला हरताळ फासल्या गेला आहे व शेतकरी अडचणीत आले आहे. नोंदणी केलेल्या शेतकर्यांना हरभरा केंद्रावर आणण्याचे मेसेज पाठविणे त्वरित बंद करा, लॉट एन्ट्री बंद करा, ज्यांनी शेतमाल केंद्रांवर आणला त्यांना तो परत घेऊन जायला सांगा असे आदेशात म्हटल्याने केंद्र प्रमुखांनी २३ मे दुपारपासूनच अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. शेतकर्यांनी हरभरा पोती केंद्रातच ठेवून ते निघून गेले तर २४ मेस काहींनी माल आणून केंद्राला कुलूप असल्याचे पाहून तो परत नेला. जिल्ह्यातील अकरा खरेदी केंद्रांमध्ये नोंदणी केलेल्या व माल विक्री होणे बाकी असलेल्या सात हजार शेतकर्यांचा १ लाख ६० हजार क्विंटल हरभरा विक्री होणे अजून बाकी आहे व अशा शेतकर्यांना हरभरा केंद्रांवर विक्रीसाठी आणण्याबाबतचे एसएमएस पाठविणे नाफेडच्या खरेदी केंद्रांनी बंद केले असल्याने शेतकरी ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर अडचणीत सापडले आहे.
पूर्वीप्रमाणे अनुदान देणार काय ?
अचानकपणे खरेदी केंद्रे बंद केल्याचा प्रकार २०१८-१९ मध्ये घडला होता. तेव्हा शासनाने नोंदणी केलेल्या परंतु शेतमाल विक्री करू न शकलेल्या राज्यातील शेतकर्यांना एकरी चार हजार रुपये व पाच एकर मर्यादेपर्यंत २० हजार रुपये अनुदान दिले होते. यावेळीही तोच प्रकार घडण्याची चिन्हे असल्याने शेतकर्यांना अनुदान देणार काय ? हा प्रश्न आहे. नोंदणी करून व खरेदी केंद्रे सुरू ठेवण्याची मुदत संपण्यास आठवडा बाकी असताना सुद्धा नाफेडने खरेदी केंद्रांना कुलूप ठोकल्याने शेतकरी संतप्त आहे.
नाफेडची हरभरा खरेदीची मुदत संपली नसताना हमीभावाने हरभरा खरेदी बंद करणे चुकीचे असून यात शेतकरी संकटात सापडला आहे. नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्यांचा हरभरा हमीभावाने २९ मे पर्यंत राज्यभर नाफेडने खरेदी करून वचनाला जागावे.
- मधुकरराव रहाटे, अध्यक्ष, तालुका खरेदी-विक्री संघ, मेहकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.