अकोट/अकोला : वंचित बहुजन आघाडीचे जि.प. कृषी समिती सभापती पंजाबराव वडाळ यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कलची जागा रिक्त होती. रिक्त जागेसाठी रविवारी (ता. १७) पोटनिवडणूक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत वंचितचे अधिकृत उमेदवार व पंजाबराव वडाळ यांचे पुत्र योगेश वडाळ यांनी तीन हजार ७८१ मते मिळवत प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गजानन नळे यांचा एक हजार ३९४ मतांनी पराभव केला. प्रतिस्पर्धी भाजपाचे गजानन नळे यांना २३८७ मते मिळाली. पोटनिवडणुकीत विजयामुळे जिल्हा परिषदेत वंचितचे पक्षीय बलाबल पुन्हा एकदा २५ झाले आहे.
अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार सर्कलमधील वंचितचे माजी कृषी समिती सभापती पंजाबराव वडाळ यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. पोटनिवडणुकीत पंचरंगी लढत झाली असली तरी प्रत्यक्ष सामना वंचित व भाजपचे उमेदवार यांच्यात झाल्याचे दिसून आले.
मतदानाच्या दिवशी रविवारी (ता. १७) सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण चार हजार ३५८ पुरुष व पाच हजार ६५१ स्त्रियांनी असे एकूण १० हजार ९ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ५८.५२ झाली. मतदानानंतर सोमवारी (ता. १८) सकाळी १० वाजता मतमोजणीला अकोट तहसिल कार्यालयात सुरुवात झाली. वंचितचे योगेश वडाळ यांनी सर्वाधिक तीन हजार ७८१ मते मिळवत भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार गजानन नळे यांचा एक हजार ३९४ मतांनी पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांनी कामकाज बघितले.
प्रतिष्ठेच्या लढाईत वंचितचा विजय
जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ जवळपास वर्षभर बाकी आहे. त्यामुळे वंचितने चोहट्टा बाजार सर्कलची पोटनिवडणूक अविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यामध्ये यश न मिळाल्याने मतदान घेण्यात आले. या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी भाजपने शक्तिप्रदर्शन केले, तर शिवसेना आमदार नितीन देशमुख सुद्धा पोटनिवडणुकीकडे जातिने लक्ष ठेवून होते. दुसरीकडे वंचितचे सर्व स्थानिक व राज्यपातळीवरील नेते सुद्धा प्रचारात उतरले होते. त्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकीत वंचितचा सहज विजय झाला.
असे मिळाले मत,उमेदवार वैध मते
- योगेश वडाळ (वंचित) ३७८१
- गजानन नळे (भाजप) २३८७
- जीवन खवले (प्रहार) १७६५
- गोपाळ म्हैसने (शिवसेना-ठाकरे) ११६०
- रविंद्र अरबट (कॉंग्रेस) ७९५
- नोटा १२१
- एकूण वैध मते १०००९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.