अकोला : सामान्य व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी घर खरेदी करावेच लागते. फ्लॅट अथवा प्लॉट खरेदी करताना कोणती दक्षता घ्यायला पाहिजे व त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची तपासणी केली पाहिजे याची माहिती सामान्य माणसाला नसते. सर्वसामान्य व्यक्तीला माहिती नसलेल्या गोष्टींमुळे अनेकदा फसगत होते.
आता हेच बघा ना! मलकापूर परिसरात असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन बनावट दस्तावेजद्वारे हडप करून त्यावर हाऊसिंग सोसायटी निर्माण करीत प्लॉट पाडून त्याची खरेदी विक्री करणाऱ्या सहा जणांविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी रात्री फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.
हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी
अकोला शहरालगत असलेल्या येवता रोडवरील मलकापूर परिसरातील शेत सर्व्हे नं.५५/२ मधील दोन एकर १८ गुंठे शेती ही लक्ष्मीनगर येथील रहिवासी असलेले अलोक खंडेलवाल हे अल्पवयीन असताना त्यांना रजिस्टर्ड बक्षीस पत्राद्वारे मिळाली होती.
मात्र, त्यानंतर वसंतकुमार हिरालाल खंडेलवाल, शारदा वसंतकुमार खंडेलवाल (रा. खंडेलवाल हाऊस जठारपेठ), अर्चना संदीप गुप्ता (रा. मुंबई) व संजय शंकरलाल बियाणी, पंकज शंकरलाल बियाणी, शैलेश कमलकिशोर बियाणी (सर्व रा. राधाकिसन प्लॉट, अकोला) यांनी या शेतीचे बनावट दस्तावेज तयार केले. त्यानंतर हाऊसिंग सोसायटी निर्माण केली.
यामधील पहिल्या तीन आरोपींनी बनावट दस्तावेजाच्या आधारे हाऊसिंग सोसायटी निर्माण करून विक्री सुरू केली. नंतरच्या तीन आरोपींनी दोन हजार ९४८ चौरस फुटांचा प्लॉट शहानिशा न करता खरेदी करून फसवणूक केली. यासह आरोपींनी संगनमताने कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून त्या जमिनीवरील प्लॉट परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयांनी फिर्यादी अलोक खंडेलवाल यांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला.
हेही वाचा - अलास्का, युरोप, अफ्रिकेमधुन आले विदेशी पाहुणे
या प्रकरणी अलोक खंडेलवाल यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चौकशी करून सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा मंगळवारी रात्री दाखल केला आहे. सहा आरोपींच्या विरुध्द भारतीय दंड विधान कलम ४६७, ४६८, ४७१,४२०,३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामदासपेठचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे करीत आहेत.
गाळा/सदनिका/फ्लॅट बिल्डरकडून खरेदी करताना
विकसनकर्ता अथवा बिल्डर कोणत्याही इमारतीचे बांधकाम करताना सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींची पुर्तता करीतच असतो व तो खरेदीदार ग्राहकाला त्याच्याकडील फ्लॅट मिळकतीबाबतच्या कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता सांगतो. अशावेळी विकसनकर्ता अथवा बिल्डरने दिलेल्या फ्लॅट मिळकतीच्या बाबतची कागदपत्रे वकिलांमार्फत तपासून घेणे आवश्यक ठरते.
सर्व प्रथम विकसनकर्ता अथवा बिल्डरच्या वकिलांनी दिलेल्या प्लॉट मिळकतीचा SEARCH REPORT/ TITLE REPORT पाहणे आवश्यक आहे. कारण त्यामध्ये प्लॉट मिळकतीचा ३० वर्षांचा शेाध व मिळकतीच्या (TITLE) बाबत वकिलांचे मत दिलेले असते. अशाप्रकारे वकिलांनी सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर गाळा/सदनिका/फ्लॅट खरेदी प्रक्रीया सुरू करावी. त्याकरिता बिल्डरकडून खालील कागद पत्रे तपासावीत.
गाळा/सदनिका/फ्लॅट/पुर्नखरेदी (Second Sale) करताना
फ्लॅट पुर्नखरेदीने घेताना वर दर्शवलेली सर्व कागदपत्रे विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून घेऊन ती वकिलांमार्फत तपासून घ्यावीत. फ्लॅट मिळकत ही नोंदणीकृत सहकारी गृहरचना संस्था यामधील असल्यास संस्थेकडून विक्रीबाबतच्या ना हरकत दाखला व संस्थेचे 'ना देय प्रमाणपत्र' (No Due Certificate) तसेच महापालिके कडून मिळकतीचे कराबाबतचे मिळकत कर विभागाकडून मना देय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे मराठी व इंग्रजीवर्तमान पत्रात सदरचा फ्लॅट निर्वेध असल्याबाबत खात्री करून घेणेबाबत जाहीर नोटीस देऊन त्याबाबत हरकती मागवाव्यात व त्याबाबात हरकत आल्यास त्याची पुर्तता करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर खरेदी देणार व खरेदी घेणार यांच्या दरम्यान होणाऱ्या करारनाम्याचा मसुदा आपसात ठरलेल्या अटी व शर्तीनुसार योग्य वकिलांच्या सल्लाने तयार करून घेणे व दस्ताची नोंदणी करणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर अडचणी येऊ शकतात.
प्लॉट खरेदी करताना घ्यावयाची काळजी
सर्वप्रथम खरेदी करावयाचा प्लॉट (भूखंड) मालकी हक्क (Free Hold) आहे, की भाडे तत्त्वावर (Lease Hold) आहे, यांची खात्री करून घ्यावी. सर्व साधारणपणे नोंदणीकृत सहकारी संस्थेमधील भूखंड भाडे तत्त्वावरील असतात व त्यामुळे या प्रकराचा प्लॉट (भूखंड) खरेदी घेताना सहकारी संस्थेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. प्लॉट (भूखंड) सेकंड सेलचा असल्यास सभासदाला भाडेकरार सहकारी संस्थेकडे सोपवून (Surrender)त्यानंतर संस्थेच्या परवानगीने नवीन सभासदाच्या नावे नवीन भाडेकरार नोंदवावा लागतो. अन्यथा हा विक्री व्यवहार बेकायदा ठरू शकतो.
प्लॉट खरेदी करताना मूळ जमीन मालकाचा ७/१२ अथवा सिटी सर्व्हेचा उतारा तपासणे आवश्यक असते. कारण ७/१२ अथवा सिटी सर्व्हेचा उतारा हा जमीन मिळकतीचा आरसा असतो. त्यामध्ये जमीन मिळकतीच्याबाबत सर्व नोंदी असतात. गावच्या नमुना नं ६ मधील मागील ३० वर्षांच्या नोंदी तपासून पाहणे आवश्यक आहे. सर्व फेरफारीच्या नोंदी तपासल्यानंतर खरेदी देणाऱ्या विद्यमान मालकाचा मालकी हक्क कायम आहे की नाही हे कळते.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
७/१२ अथवा सिटी सर्व्हेच्या उताऱ्यामध्ये कूळ म्हणून कोणाचे नाव आहे का? हे पाहवे व असल्यास कुळाच्या हक्काबाबतची माहिती तपासावी. ७/१२ अथवा सिटी सर्व्हेच्या उताऱ्यावर इतर हक्कांत सहकारी बँका, पतपेढ्या, सोसायट्या, सरकारी तगाई असलेल्या नोंदींची तपासणी करावी. ते फिटल आहेत का हे पाहावे. ७/१२ अथवा सिटी सर्व्हे उताऱ्यामध्ये जमीन वहिवाट करणाऱ्याचे अथवा कसणाऱ्याचे नाव दर्शविलेले असते.
त्यामुळे त्या जमिनीमध्ये खरेदी देणाऱ्या इसमांची वहिवाट आहे का? हे तपासून पाहावे. प्लॉट मिळकत खरेदी करताना जमिनीवर असणारे कर्जाचे बोजे फिटले असल्याचे दाखले घ्यावेत. ७/१२ अथवा सिटी सर्व्हे सदरील इतर हक्कात कोणाची नावे समाविष्ट असल्यास त्या व्यक्तीची संमती प्लॉटच्या खरेदी खताच्यावेळी संमती घेणे आवश्यक आहे. प्लॉट मिळकतीवर कोणत्याही सार्वजनिक कामाकरिता संपादन असल्यास त्याबाबत संबंधित 'नगर रचनाकार' जिल्हाधिकारी, कार्यालय भूमी संपादन शाखेकडून त्याबाबतची माहिती करून घ्यावी. ७/१२ च्या उताऱ्यावर 'नवीन शर्त' असा शेरा असल्यास जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय अशी प्लॉट मिळकत घेता येणार नाही.
७/१२ च्या उताऱ्यावर 'कूळ कायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र' असा शेरा असल्यास अशी प्लॉट मिळकत जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय विकत घेऊ नये. तसेच ७/१२ च्या उताऱ्यावर इतर अधिकारात '८४ (क)स पात्र' असा शेरा असल्यास अशी प्लॉट मिळकत ही सरकार जमा होऊ शकते. प्लॉट मिळकतीबाबत जमीन मालकाने सर्व कर, पट्ट्या चालू तारखेपर्यंत भरल्या आहेत, यांची खात्री करावी. तसेच प्लॉट मिळकतीबाबात जमीन मालकांनी कोणाशीही लेखी अथवा तोंडी करार झाला आहे का? अथवा या मिळकतीवर कोणाही व्यक्तीचा संस्थेचा हितसंबंध आहे का?
हेही वाचा - प्रवाशी घेऊन जात असलेला ऑटो बिघडला, खाली उतरताच अज्ञात वाहन आले अन् क्षणात घडले असे काही
याबाबत स्थानिक लोकांकडे चौकशी करावी. मराठी व इंग्रजी स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस द्यावी व हरकती मागवाव्यात. प्लॉट खरेदी करताना प्लॉटच्या चारही दिशांना म्हणजेच चतु:सीमेअन्वये कोण जमीन मालक आहे, याची खात्री करून घ्यावी. तसेच या बाबतचा नकाशा तयार करून तो खरेदी खतास जोडावा व त्यावर खरेदी देणाऱ्यांच्या सह्या घ्याव्यात. प्लॉट मिळकत ही 'मान्य ले आऊटप्रमाणे असल्यास' या बाबतचा नकाशा व आदेश (ऑर्डर), वकील व आर्किटेक्ट यांच्याकडून तपासून घ्यावे.
साधारणतः फ्लॅट व प्लॉट खरेदीदाराने वरीलप्रमाणे काळजी घेतल्यास, त्याला फ्लॅट व प्लॉट खरेदीपश्चात कोणतीही अडचण येणार नाही व चुकीची मिळकत खरेदी, घेण्याबाबतचा मनस्ताप होणार नाही.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.