अकोला : विदर्भात वर्षोगणती शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. त्यासाठी उत्पादनातील घट, नुकसान व इतरही बरीच कारणे आहेत. मात्र, या सर्व कारणांवर मात व्हावी व हे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायमचे थांबावे, हे माझे स्वप्न आहे आणि त्याला संशोधन, शिक्षण, विस्तार, नवतंत्रज्ञान, व्यवस्थापन व प्रात्यक्षिक कृतीतून सिद्धीस नेण्याचे काम डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषिचे स्नातक करू शकतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल तथा ‘डॉ.पंदेकृवि’चे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सन्मानिय अतिथी मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय व डॉ. पंदेकृवि अकोल्याचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. एम.एल. मदान, कुलगुरू डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, आमदार विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेद, पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारंभामध्ये कृषीच्या विविध विद्याशाखेच्या ३६४६ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यामध्ये कृषी व कृषी अभियांत्रीकी विद्याशाखेच्या ३२३४ तर, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखेच्या ३८१ स्नातकांना व ३१ आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यांच्यापैकी दीक्षांत समारंभात ३१ आचार्य पदवीधारक व २२५ स्नातकोत्तर पदवीधारक पदवीकांक्षींना स्वतः उपस्थित राहून पदवी प्रदान करण्यात आल्या तर, उर्वरित ३३९० स्नातक व स्नातकोत्तर पदवीकांक्षींनी अप्रत्यक्षरित्या पदव्या स्वीकारल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विद्यापीठाचे अहवाल वाचन केले. त्यानंतर पदवीदान सोहळा झाला. प्रमुख अतिथी असलेले डॉ. मदान यांनीही आपले मार्गदर्शन केले. कुलपतींनी हा सोहळा समाप्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर पसायदान व राष्ट्रगिताने समारंभाची सांगता झाली.
‘पूनम’ ठरली सुवर्ण कन्या
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात एकूण ३१ आचार्य व ८२ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये एम.एसस्सी. पीजीआयची विद्यार्थीनी पूनम हनुमंतराव देशमुख हीने सर्वाधिक ५ सुवर्ण, एक रौप्य असे सहा पदकांची कमाई केली. तिच्या खालोखाल बी.एसस्सी. ॲग्रीकल्चरचा विद्यार्थी दुर्गेश कैलास नरवाडे याने तीन सुवर्ण व तीन रोख असे सहा पुरस्कार पटकाविले तर, बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)ची विद्यार्थीनी अश्विनी वासुदेव हुशे हीने दोन सुवर्ण, एक रौप्य व चार रोख असे सात पदके मिळवून नावलौकिक मिळविला.
शेतकऱ्यांनी उर्जादाता व्हावे
सकल घरेलू उत्पादनात योगदान कमी मात्र, शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या अधिक, अशी परिस्थिती सध्या आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतीवर आधारित उद्योगात गुंतवणूक व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढवायला हवे. त्यासाठी ग्रीन हायड्रोजन, बायो डीजल यासारख्या उत्पादनांकडे शेतकऱ्यांनी वळावे आणि केवळ अन्नदाता न होता उर्जादाता ही व्हावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले.
संस्काराची शिदोरी घेऊन चला :राज्यपाल कोश्यारी
विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाचा उद्देश ओळखावा. आदर्श नागरिक बनण्याचे संस्कार घेऊन विद्यापीठातून बाहेर पडावे, जेणे करून आपण सर्व मिळून कृषितंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवू आणि देशाला समृद्धीकडे नेऊ शकू, अशा शब्दात राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी च्या दीक्षांत समारंभात स्नातकांना मार्गदर्शन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.