अकोला : अकोला ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) असलेल्या रिधोरा जवळ सुरू असलेल्या ईगल कंपनीच्या डांबर प्लांटमध्ये बॉयलरचा (boiler) स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या निवेदनावरून आमदार विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांनी सोमवारी (ता. २७) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2021) लक्षवेधी मांडली. त्यावर सरकारकडून आठ दिवसांत आरोपींना अटक करण्यात येईल, तसे झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
रिधोरा जवळ असलेल्या ईगल कंपनीच्या डांबरप्लांट मध्ये २४ नोव्हेंबर रोजी स्फोट झाला होता. स्फोटात दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. एवढ्या गंभीर घटनेनंतरही या प्रकरणात पोलिसांकडून उशिराने गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल झाल्यानंतरही आरोपींना अटक झाली नाही. याप्रकरणी संबंधित आरोपींवर कायदेशीर कार्यवाही करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांना निवेदन दिले होते.
आमदार विनायकराव मेटे यांनी सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडून याप्रकरणी सरकारला जाब विचारला. इतर आमदारांनी सुद्धा या मुद्द्यावर आवाज उठविला. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले की काही कारणामुळे उशीर झाला असला तरी येत्या आठ दिवसांत संबंधित आरोपींना अटक करण्याची कारवाई केली जाईल. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल.
कंपनीवर कार्यवाही करण्यासाठी श्रम आयुक्त कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही. या लक्षवेधीला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार आता लवकरच संबंधित आरोपींवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. आठ दिवसांत आरोपींना अटक होणार की नाही आणि या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी सरकार कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मजुरांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही
या प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्या संबंधित आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही आणि मूळ मालकावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. कामगारांच्या जीविताची काळजी नसलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकून कामगारांना न्याय मिळेपर्यंत आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करू. सरकारने न्याय दिला नाही तर या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करू, अशी भूमिका शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.