मोताळा (जि.बुलडाणा) : एका ५५ वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची घटना पिंपळखुटा बुद्रुक (ता.मलकापूर) शिवारात बुधवारी उघडकीस आली होती. सोबतच या महिलेच्या दोन मुलींचाही खून करून विहिरीत फेकल्याचे गुरुवारी (ता.१५) समोर आले आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून सदर हत्याकांड घडल्याचे समजते. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे अवघा जिल्हा हादरला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा बुद्रुक येथील शंकर त्र्यंबक मालठाणे हे पत्नी सुमनबाई (५५), विधवा मुलगी राधा (२८) व घटस्फोटीत मुलगी शारदा (२५) यांच्यासह एकत्रित राहतात. राधाच्या पतीचा मृत्यू झाल्याने ती मागील आठ-दहा वर्षांपासून माहेरी राहत होती. तर, दुसरी मुलगी शारदाचा घटस्फोट झाल्याने ती सुद्धा दीड ते दोन वर्षांपासून आई-वडिलांकडे वास्तव्यास होती. शंकर मालठाणे यांची एक मुलगी अनैतिक संबंधातून पाच महिन्यांची गर्भवती असल्याची चर्चा गावात होती.
दरम्यान, सुमनबाई, राधा व शारदा या तिघ्या मायलेकी बुधवारी (ता.१४) पहाटे तीन वाजल्यापासून बेपत्ता होत्या. बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास सुमनबाईचा मृतदेह पिंपळखुटा शिवारात एका शेतातील हौदात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. तसेच बाजूला तुटलेल्या बांगड्या व रक्ताचा सडा होता. यावेळी राधा व शारदा या दोघ्या बहिणी बेपत्ता होत्या. पोलिस पाटील शेषराव शालीग्राम उमाळे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली.
पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारावर संशयीत आरोपी दादाराव अंबादास म्हैसागर (३८, रा. पिंपळखुटा बुद्रुक) यास बुधवारी सायंकाळी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने राधा व शारदाचा मृतदेह परिसरातील पडक्या विहिरीत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन दोघींचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी रवाना केला. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी दादाराव अंबादास म्हैसागर यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड करीत आहेत.
काही तासातच गुन्ह्याची उकल
जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले व डीवायएसपी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक माधवराव गरुड व सहकाऱ्यांनी चाणाक्षपणे तपास करीत या तिहेरी हत्याकांडाचा काही तासातच उलगडा केला आहे. यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत, असे डीवायएसपी रमेश बरकते यांनी दै.सकाळशी बोलताना सांगितले.
हाकेच्या अंतरावर मायलेकीचे मृतदेह
सुमनबाई यांचा मृतदेह बुधवारी परिसरातील शेतातील हौदात आढळून आला होता. या घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पडक्या विहिरीत राधा व शारदा या दोघींचा मृतदेह फेकलेला होता. पोलिसांनी गुरुवारी दोघींचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
संपादन : सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.