Akola News : महाविकास आघाडी सोबत आघाडी होण्याची शक्यता धुसर झाल्यानंतर वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी सोलापूर मतदार संघातुन उमेदवारी दाखल केली होती. अकोला प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत लोकसभा मतदार संघ असुन या मतदार संघातून त्यांनी दोनदा (1998 आणि 1999) लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. पण, इतर सर्व निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला होता.
यंदा संपुर्ण राज्याचे लक्ष अकोला लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. या ठिकाणी भाजपने घराणेशाही जपत माजी केंद्रिय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना तिकिट दिले आहे.
तर काँग्रेस ने अद्याप या मतदार संघात उमेदवार घोषित केला नाही. या मतदार संघात काँग्रेस तर्फे मुस्लिम उमेदवार येतो की मराठा हे पाहण्यासारखे ठरेल. काँग्रेस ने मुस्लिम उमेदवार दिल्यास नत्तीकोद्दीन खतीब किंवा मराठा उमेदवार दिल्यास डाॅ.अभय पाटील हे अकोल्यात उमेदवार असु शकतात.
तत्पुर्वी काँग्रेसला राज्यातील सात लोकसभा मतदार संघात वंचितने पाठिंबा दिला असून त्या मतदार संघात वंचित आपले उमेदवार उभे करणार नाही. त्या सात मतदार संघाची यादी काँग्रेसला वंचितला सादर करावी लागणार आहे.
आंबेडकर यांनी स्वतःहुन राज्यातील सात लोकसभा मतदार संघात काँग्रेस समोर उमेदवार उभे करणार नाही हे स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसवर अकोल्यात उमेदवार उभा करण्याचा नैतिक दबाव निर्माण झाला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच दिल्लीत निवडणुक आयुक्तांची भेट घेत वंचित बहुजन आघाडीसाठी चिन्हांची मागणी केली आहे. गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर हे चिन्ह त्यांनी निवडणुक आयोगाकडे मागितले आहे. राज्यात काही जागांवर वंचित लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत यातुन प्राप्त होत आहे. एकदा निवडणुक आयोगाने वंचितला चिन्हं घोषित केले की वंचित राज्यातील इतर ठिकाणचे उमेदवार घोषित करेल.
वंचित नेते प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत कोण येणार असा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. संपुर्ण राज्यात वंचित नेते प्रकाश आंबडेकर हे महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्र बिंदु ठरत आहे.
त्यामुळे त्यांच्या निर्णयामुळे अनेक मतदार संघात मोठे बदल होऊ शकतात. आंबेडकर यांनी प्रयत्न करुन देखील महाविकास आघाडीने त्यांना स्विकारले नाही. अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे ची भुमिका घेण्याची शक्यता आहे. 26 मार्च रोजी ते महाविकास आघाडीची अंतिम चर्चा करणार असुन वंचित च्या निवडणुकीची पुढील दिशा त्यांनी 26 मार्च रोजी घोषित करण्याचे निश्चित केले आहे.
भारत निवडणुक आयोगाने जाहिर केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 06 अकोला लोकसभा मतदार संघाकरीता सार्वत्रिक निवडणुकीचा आणि अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम हा जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला आहे.
त्यानुसार गुरुवार 28 मार्च रोजी निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द करणे आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख ही गुरुवार 28 मार्च असेल. अकोला लोकसभा मतदार संघात नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम दिनांक ही 4 एप्रिल आहे. उमेदवारी अर्ज छाननी 5 एप्रिल रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल रोजीची आहे. तर मतदान 26 एप्रिल रोजी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.